संग्रहित फोटो
राजापूर: कोकणातील प्रस्तावित बारसू सोलगाव येथे रिफायनरी प्रकल्प (Barsu Refinery Project) विरोधात स्थानिक आक्रमक झाले असून, आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान, आज आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. सोमवारी जमिनीचे (Land) सर्वेक्षण केलं जाणार होतं. मात्र स्थानिकांचा विरोध पाहता, सर्वेक्षण पुढे ढकलले असले तरी स्थानिक आंदोलनावर ठाम आहेत. बारसू रिफायनरीवरुन राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असताना, आता माजी उपमुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रतिक्रिया समोर आली असून, बारसूतील सर्वेक्षणाला स्थगिती द्यावी, अशी मागमी त्यांनी केली आहे.
रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस.आंदोलक ठाम असून त्यात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे.खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावलं आहे.त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 25, 2023
पोलिसांनी दंडुकेशाहीचा वापर करु नये
बारसू रिफायनरीसाठी होणारे सर्वेक्षण तात्काळ स्थगित करून मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी व त्यावर मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका, अशी विनंती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्वीट करत सरकारला केली आहे. रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. त्या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावले आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.
बारसूत जालियानवाला हत्याकांड घडण्याची भीती – राऊत
रत्नागिरीत बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला आहे. त्यामुळं येथे वाद पेटण्याची शक्यता आहे, यावर बोलताना राऊत म्हणाले की, रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आहे, आंदोलनावर लोकं ठाम आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून आंदोलकांवर दडपशाही सुरु आहे. बारसूतील आंदोलकांना पोलिसांच्या माध्यमातून धमकावलं जातंय, बारसूत जालियानवाला हत्याकांड घडण्याची भीती आहे. आंदोलकांना धमक्या दिल्या जाताहेत. असा आरोप राऊतांनी केला. बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलक आक्रमक झाले आहेत. सर्वेक्षणविरोधातील आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात कऱण्यात आला आहे.
विरोधी संघटनेचे अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना अटक
दरम्यान, आज कोकणातील रिफायनरीच्या सर्वेक्षणविरोधातील आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. प्रशासनाने समज देऊनही नागरिक आंदोलनावर ठाम आहेत. याशिवाय उद्धव ठाकरे आज या मुद्दयावर पत्रकार परिषदही घेणार आहेत. त्यामुळे रिफायनरीचा मुद्दा तापण्याची चिघळण्याची चिन्हे आहेत. कोकणातील बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबईचे अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना काल (सोमवारी) राजापूरमध्ये अटक झाली. त्यांच्यासोबत आणखी दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांना रत्नागिरीत ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.