अक्कलकोटमध्ये 100 कुत्र्यांवर विषप्रयोग
अक्कलकोट: अक्कलकोट शहरात दिनांक 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी मोकाट वावरणाऱ्या जवळपास शंभर कुत्र्यांवर विष प्रयोग झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात कुत्रे मृत्यू पावल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याची गंभीर दखल आता पाल ॲनिमल वेल्फेअर फाउंडेशन या प्राणी मित्र संघटनेने घेतली असून शहरातील प्राणीप्रेमी ही आक्रमक झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.
यातील काही कुत्र्यांनी जरी चावा घेतलेला असला तरी त्याचा बंदोबस्त अन्य मार्गाने करण्याची सोय सरकारने केली असताना अशा पद्धतीने प्राण्यांना मारणे हे अत्यंत चुकीचे असल्याची प्रतिक्रिया शहरवासीयातून व्यक्त होत आहे.
वीस हजारांच्या लाचप्रकरणी हवालदारासह दोघांना अटक; वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नक्की काय घडले?
२९ नोव्हेंबरपासून शहरात वेगवेगळ्या चौकांमध्ये आणि गल्लीमध्ये कुत्रे हे मोठ्या प्रमाणात तडफडून मरत आहेत. त्यांच्या तोंडातून काळी लाळ बाहेर येत आहे.ही घटना शहरात सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर प्राणीमात्रावर प्रेम करणाऱ्या युवकांनी एकत्र येत नगरपालिका आणि पशुवैद्यकीय विभाग गाठले.त्याची चौकशी केली.मात्र या दोन्ही विभागाकडून आम्हाला याबाबत काहीच कल्पना नसल्याचे सांगण्यात आल्याने तरुण चांगलेच आक्रमक झाले. याबाबत चौकशी करू, अशी उत्तरे मिळाल्याचे या तरुणांनी सांगितले. यानंतर त्यांनी थेट मुंबईच्या पाल ॲनिमल वेल्फेअर फाउंडेशन या संघटनेकडे तक्रार करत या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.
कारवाईचीदेखील मागणी
दरम्यान या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.या संदर्भात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा देखील दाखल झाला असून हे प्रकरण अद्याप तरी संशयास्पद स्थितीमध्ये आहे.या घटनेची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही त्यामुळे इतके कुत्रे नेमके कशामुळे मेली याबाबतचा तपास अद्याप होऊ शकला नाही.
माणुसकीच्या नात्याने काही कुत्र्यांवर अक्कलकोटममधील काही तरुणांनी एकत्र येत अंत्यसंस्कार केले. यातील काही कुत्र्यांचा पोस्टमार्टम झाला असून त्याचा तपासणीसाठी नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. आता हा अहवाल आल्यानंतरच आपल्याला हे कुत्रे इतके मोठ्या प्रमाणात का मेले याचा तपास लागू शकेल,असे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश मुरूमकर यांनी सांगितले. दरम्यान जे कुत्रे मरून पडले ते कुत्रे शहराच्या आजूबाजूला जेसीबीने खड्डा खोदून पुरले असल्याची माहिती या तरुणांनी दिली आहे. त्यामुळे हा प्रकार नक्कीच संशयास्पद आणि धक्कादायक असल्याने या प्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकाला सापाचा डंख; दुसरा तोंडानं विष काढताना चक्कर येऊन पडला अन्…
काय म्हणाले फाऊंडेशन
नगरपरिषदेकडून माहिती मागवली असून यासंदर्भात आम्ही नगरपरिषदेकडे विचारणा केली आहे. उद्या पर्यंत ते माहिती देणार आहेत. जर त्यांची माहिती आम्हाला चुकीची आणि नियमबाह्य वाटली तर त्यांना आम्ही लिगल नोटीस देणार आहोत.त्याशिवाय या प्रकरणाचा तपास त्वरीत न लागल्यास आंदोलन करू आणि शहरामध्ये कॅण्डल मार्च काढून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करू असे रोशन पाठक, पाल ॲनिमल वेल्फेअर फाउंडेशन, मुंबई यांनी यावेळी सांगितले आहे.
प्राणी मित्र संघटनेने उचलले पाऊल
प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि कुठल्याही प्राण्यांना अशा पद्धतीने मारता येत नाही. त्याला सरकारकडूनच बंदी आहे. पण एकाच वेळी शहरात अशा पद्धतीने कुत्रे मरून पडणे नक्कीच संशयास्पद आणि धक्कादायक प्रकार आहे त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून ही तक्रार केली आहे. झालेला संपूर्ण प्रकार चुकीचा आणि नियमबाह्य आहे असे अतिष कटारे, प्राणी मित्र संघटना यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या आहेत.