सोलापूरमध्ये अपघाताच्या घटनास्थळातील पंचनाम्याचे कागदपत्रे देण्यासाठी 20 हजारांची लाच मागण्यात आली. (फोटो - istock)
सोलापूर : राज्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. तसेट लाचखोरीच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. आता सोलापूरमध्ये असेच लाचखोरीचे प्रमाण समोर आले आहे. अपघाताच्या घटनास्थळातील पंचनाम्याचे कागदपत्रे देण्यासाठी 20 हजारांची लाच मागण्यात आली. तसेच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी हवालदारासह दोघांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई शनिवारी सायंकाळी करण्यात आली.
हवालदार राहुल इरण्णा सोनकांबळे (वय ५२ वर्षे), मनोज किशोर वाघमारे (४० रा. सिद्धार्थ नगर वैराग, बार्शी) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तक्रारदाराचे वडील रस्ते अपघातामध्ये जखमी झाले होते. या प्रकरणी 11 ऑक्टोबरला वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास हवालदार राहुल सोनकांबळे
यांच्याकडे होता. इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी घटनास्थळ पंचनाम्याची कागदपत्रे तक्रारदाराला हवे होते. हवालदार सोनकांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी 20 हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीने ही रक्कम १५ हजार रुपये देण्याचे ठरले. खासगी व्यक्ती मनोज वाघमारे याच्यामार्फत सोनकांबळे यांनी स्वतः करिता रक्कम स्वीकारली. दोघांनाही ॲन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई ॲन्टी करप्शनचे पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार, हवालदार श्रीराम घुगे, प्रमोद पकाले, शिपाई राजू पवार, चालक राहुल गायकवाड यांनी पार पाडली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सोलापूरमध्ये अत्याचाराची घटना
सोलापूरमध्ये गतिमंद महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुरज केंद्रे यांनी 10 वर्षांची सक्तमजुरी व 12 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. गणेश अभिमन्यू माने (वय 42, रा. कौठाळी, ता. उत्तर सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित गतिमंद महिलेच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील पीडिता ही गतिमंद असून, ती अपंगही आहे. 6 डिसेंबर 2020 रोजी रात्री पीडिता ही तिच्या घरातील खोलीत झोपली होती. यावेळी आरोपी गणेश माने याने पीडितेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. याबाबत सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक देवडे यांनी तपास करून आरोपीला अटक केली. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिले. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश केंद्रे यांच्यासमोर झाली. या खटल्यात सरकारतर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडितेचा भाऊ आणि डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सरकारी वकिलांचा महत्त्वपूर्ण युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश केंद्रे यांनी आरोपी गणेश माने याला बलात्कारप्रकरणी 10 वर्षे सक्तमजुरी व 12 हजार रुपये दंड आणि दंड नाही भरला तर 3 महिने साधी कैद एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड आणि दंड नाही भरला तर एक महिना साधी कैद आणि दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावली.