Dombivli Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे आणि राजकीय प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या असल्याने या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर नेहमीच आरोप करीत असतात, तर दुसरीकडे शिवसेनेतील फाटाफुटीनंतर ठाकरे गट व शिंदे गटातील नेतेमंडळीत विस्तव काही विझायचे नाव घेत नाही. दोन्ही गट एकमेकांवर टीका करण्याची नेहमीच संधी शोधत असतात.
जसे बॉस तसे बिचारे पदाधिकारी वागतात
डोंबिवलीच्या (Dombivli Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी विरोधी पक्षातील संभाव्य उमेदवार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची मिमिक्री करीत त्यांच्यावर निशाणा साधला. याला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उत्तर देताना दरेकर यांच्या आडून थेट ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नेते संजय राऊत यांच्यावर शाब्दिक वार केले. मी त्यांची चुकी मानत नाही. जसे बॉस वागतो तसे बिचारे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना करावे लागते. निवडणूक झाल्यावर त्यांच्याकडे तेच काम उरेल, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
श्रीकांत शिंदेवर टीकास्त्र
महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर या कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ येथे प्रचारासाठी गेल्या असता, त्यांनी महायुतीचे संभाव्य उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. ज्यांना अ ब क येत नव्हते. त्यांना ते शिवसेनेने शिकवले. अ ब क काय म्हणजे काय? आपण जे काम करतोय, आपल्याकडील सध्याची परिस्थिती किंवा समाजामध्ये जे काय चाललंय याचे विचार ज्याच्या मेंदूमध्ये क्लीअर असतात, तो कधी ‘या ठिकाणी, त्या ठिकाणी’ मग असे करत नाही, असे नक्कल करून दाखविले.
आज मी अंबरनाथमध्ये आले, अंबरनाथमध्ये लोकांचे प्रश्न काय आहेत ? मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की, आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला तुम्ही इथे विचारलं ना की अंबरनाथमधील प्रश्न काय? तर तो तुम्हाला झटपट सांगेल. कारण तो रोज अंबरनाथमध्ये रस्तो रस्ते फिरतोय. जो अनुभवतो ना त्याच्या डोक्यामध्ये सगळे विषय क्लीअर असतात, असे म्हणत वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करत मिमिक्री केली होती. त्यालाच श्रीकांत शिंदेंनी पलटवार करीत बोचरी टीका केली.