विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलींमुळे एसटीच्या उत्पन्नात भरघोस वाढ; महामंडळाने केली तब्बल 11.28 लाखांची कमाई (File Photo : ST Buses)
गोंदिया : दिवाळीच्या सुट्या आटोपताच शाळा-महाविद्यालयांनी वार्षिक सहलींचे नियोजन सुरू केले. विद्यार्थ्यांच्या या उत्साहात यंदा भर घालण्याचे काम राज्य परिवहन मंडळाने केले आहे. एसटीने यावर्षी शालेय सहलींसाठी विशेषतः नवीकोरी लालपरी बस उपलब्ध करून दिली आहे.
परिवहन महामंडळाकडून गोंदियासह राज्यातील २५१ आगारांमधून एकूण ८०० ते १००० हजार बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास केवळ आनंददायीच नाही, तर सुरक्षित, स्वच्छ आणि आरामदायीसुद्धा झाला आहे. कमी भाड्यात अधिक सुविधा आणि प्रशिक्षित चालक-वाहक यांच्या मदतीने यंदाच्या सहलींचा अनुभव अविस्मरणीय करण्याचे प्रयत्न एसटी महामंडळाने सुरू केले आहे. यंदा नवीन बसच्या ताफ्यामुळे नवीन लालपरी दाखल झाल्या आहेत. गोंदिया आगारातून सहलीसाठी ४३ बस धावल्या असून, यंदा सहलीतून ११ लाख २८ हजार ३२० रुपये गोंदिया आगाराला भाडे स्वरूपात मिळाले आहेत. एसटी महामंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी खास नवीकोरी लालपरी सहलींसाठी उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.
हे देखील वाचा : पुणे मेट्रो लाईन-2 च्या रामवाडी-वाघोली विस्ताराला गती; आता 4.7 किमीचा सहापदरी एलिव्हेटेड रस्ता उभारणार
सद्यस्थितीत महामंडळाकडे ज्या नव्या बस आहेत, त्यामधून सहलीसाठीही बस उपलब्ध करून दिल्या जातील. वर्ष २०२४-२५ मध्ये गोंदिया आगारातून १५ बसेस शैक्षणिक सहलीसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. आरामदायी व सुखकर प्रवास म्हणून लालपरीला ओळखले जात असल्याने अनेक शाळा-महाविद्यालयांना बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामुळे एरवी तोट्यात धावणारी लालपरी आता नफ्यात आहे.
आगारप्रमुखांनी दिली प्रत्येक शाळेला भेट
एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक यांच्या नेतृत्वात आगारप्रमुख, बसस्थानकप्रमुख हे प्रत्येक शाळांना भेट देऊन बस नियोजन, सुविधा आणि उपलब्धतेबाबत माहिती देत आहेत. तसेच संपर्क क्रमांकसुद्धा गोळा करत आहेत. थंडीच्या दिवसात शाळेची शैक्षणिक सहल काढण्यात येते. दिवाळीनंतर आता शाळांनी बुकिंगचे प्राथमिक वेळापत्रक तयार करणे सुरू केले आहे.
मुलांच्या इच्छेप्रमाणे प्रेक्षणीय स्थळांना भेट
cमुलांच्या इच्छेप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रेक्षणीय व ऐच्छिक स्थळे दाखविण्यात येत आहेत. राज्य परिवहन महामंडळाकडून जिल्ह्यातील आगारांमधून विविध ठिकाणच्या शालेय सहलीसाठी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. महामंडळातील ४३ बस बुक केल्या होत्या. त्यातून ११ लाख २८ हजार ३२० रुपये महसूल प्राप्त झाला आहे.






