सौजन्य - नवराष्ट्र टीम
मिळालेल्या माहितीनुसार, वाशी येथे संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने तात्काळ धाड टाकली. पथकाची गाडी येत असल्याचे लक्षात येताच साड्यांनी भरलेला टेम्पो चालक पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र सतर्क पथकाने पाठलाग करून वाहनासह चालकाला ताब्यात घेतले.
टेम्पोची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर साड्यांचा साठा आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार या साड्यांची किंमत सुमारे पाच लाख रुपये आहे. या साड्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना वाटप करण्यासाठी आणल्या असाव्यात, असा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
ही कारवाई भरारी पथकाचे प्रमुख प्रवीण कोडोलीकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली असून, पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, साड्या कुठून आणल्या, कोणासाठी होत्या आणि यामागे कोणाचा संबंध आहे, याचा तपास सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पुढील काळात निवडणूक आयोगाच्या पथकांकडून आणखी धाडी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापौर पदासाठी टोकाची स्पर्धा
महापौर पदासाठी आता टोकाची स्पर्धा पाहायला मिळत असून, महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोल्हापूर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापौरपदावर नेमकी कोणाची वर्णी लागणार, याबाबत कोल्हापूरवासीयांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यातच महापौर पदावर भाजप आणि शिंदेसेना या दोन्ही पक्षांकडून जोरदार दावा करण्यात आल्याने ही लढत अधिकच रंगतदार बनली आहे. कोल्हापूर महापालिकेतील सत्तासंघर्ष आता केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित न राहता, थेट राज्यस्तरीय समीकरणांशी जोडला गेला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाचा निर्णय भाजप की शिंदेसेना यांच्यापैकी कोणाच्या वाट्याला जाणार, यावरच कोल्हापूरच्या महापौर पदाचा तिढा सुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांचे लक्षही मुंबईकडे लागले आहे.






