Photo Credit- X@Eknath Shinde पर्यटकांना घेऊन एकनाथ शिंदे मुंबईत दाखल; विमानतळावर नेमकं काय घडलं
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांलक भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यामध्ये ६ महाराष्ट्रातील नागरिकांचा समावेश आहे. या हिंसक घटनेनंतर जम्मू-काश्मीरमध्ये असंख्य पर्यटक अडकले होते. त्यात महाराष्ट्रातील नागरिकही मोठ्या संख्येने होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने जम्मू-काश्मीरकडे रवाना झाले. पर्यटकांना ते स्वत: विमानाने महाराष्ट्रात घेऊन आले. मुंबई विमानतळावर दाखल होताच अनेक पर्यटकांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित परत आणण्यासाठी राज्य शासनाने विशेष विमानांची व्यवस्था केली होती. या विशेष विमानाने तब्बल १८३ पर्यटक गुरुवारी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास मुंबई विमानतळावर सुखरूप उतरत आपापल्या कुटुंबीयांच्या भेटीला पोहोचले. या विशेष विमानाने १८३ पर्यटक गुरुवारी सायंकाळी सुमारे सात वाजता मुंबई विमानतळावर सुखरूप उतरले. दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी शासनाने त्वरीत पावले उचलली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ही विशेष उड्डाण व्यवस्था करण्यात आली होती. विमानतळावर उतरल्यानंतर पर्यटकांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि समाधान दिसून आले.
विमानतळावर पोहचल्यानंतर काही पर्यटकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. पुण्यातील पर्यटक ज्योती झुरुंगे म्हणाल्या की, “काश्मीरमध्ये आम्ही भीतीच्या सावटाखाली अडकून पडलो होतो. वातावरण इतकं तणावपूर्ण होतं की, कधी एकदा पुण्यात परत येतो, असं वाटत होतं. पण शासनाच्या विशेष विमान व्यवस्थेमुळे आम्ही अखेर सुखरूप मुंबई विमानतळावर पोहोचलो आणि सुटकेचा नि:श्वास टाकला, शासनाने वेळेवर केलेली ही व्यवस्था खूपच चांगली होती. आम्हा सर्वांनी सुरक्षिततेची अनुभूती घेतली. आम्ही शासनाचे मनापासून आभार मानतो.”
मुंबई विमानतळावर पोहचल्यानंतर, उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे अडकून पडलेल्या पर्यटकांपैकी १८४ पर्यटकांना मुंबईला घेऊन जाणारे दुसरे विमान आज श्रीनगरहून मुंबईकडे रवाना झाले. श्रीनगर येथून रवाना होण्यापूर्वी या पर्यटकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि सुरक्षित प्रवासासाठी या सर्वांना आश्वस्त करून निरोप दिला.” त्याचवेळी, पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात रायगड जिल्ह्यातील कामोठे येथील रहिवाशी सुबोध पाटील हे श्रीनगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्याठिकाणी जाऊनही एकनाथ शिंदेंनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना सहकार्याचे आश्वासन दिले.