गुवाहाटी : एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. बहुमत (Majority) चाचणीसाठी येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. ३० जूनला बहुमत सिद्ध होणार असून राज्यपालांनी तसे निर्देश दिले आहेत.
राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिवसेनेतील (Shivsena) अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे (MVA) अस्तित्व धोक्यात आले आहे. शिवसेनेचे नेते तथा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांसह केलेल्या बंडामुळे (Rebellion) राज्यात राजकीय नाट्य निर्माण झाले आहे.
सध्या एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार आसाममधील गुवाहाटी येथे आहेत. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडून बंडखोर आमदारांना वारंवार परत येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.