घाणेरडी भाषा, तरीही संयम ठेवला'; उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता निवडणूक आयोगाची टीका
Rajiv Kumar On Uddhav Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षातील मोठ्या नेत्यांच्या बॅगा तपासल्या होत्या. त्यावर ऐन निवडणुकीत बरंच वादंग उठलं होतं. उद्धव ठाकरे यांनी तर त्याचा व्हिडिओ करून व्हायरल केला होता. शिवाय निवडणूक अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं होतं. त्यावरही आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नाराजी व्यक्त करत, उद्धव ठाकरे याचं नावं न घेता कान टोचले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीचे आज वेळापत्रक पत्रकार परिषदेत जाहीर केलं. ७० आमदार असलेल्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २३ फेब्रुवारी रोजी संपत आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यानंतर दिल्लीत आचारसंहिता लागू झाली आहे. दिल्लीत ५ फेब्रुवारीला मतदान तर ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. यावेळी नाव न घेता राजीव कुमार यांनी उद्धव ठाकरेंना खडे बोल सुनावले.
महाराष्ट्र निवडणुकी दरम्यान हल्ला पाहण्यास मिळाला. तो म्हणजे आमचं हेलिकॉप्टर तपासत आहात, मग त्यांचं का नाही? यांचं का नाही तपासलं? घाणेरड्या भाषेचा उपयोगही करण्यात आला. आम्ही उत्तर दिलं नाही संयम ठेवला. मतदानाच्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांना धमक्या देण्यापर्यंत मजल गेली. मात्र आम्ही शांत बसलो. निवडणुकीत स्टार प्रचारक आणि राजकीय नेते यांनी शिष्टाचार आणि सभ्यता पाळली पाहिजे. महिलांच्या विरोधात बोलणं टाळलं पाहिजे, मुलांच्या विरोधातही काहींनी भाष्य केलं. अशा लोकांना आमची हात जोडून विनंती आहे की प्रचाराची पातळी एवढी घसरू देऊ नका. त्यामुळे मतदानाला येण्याची नव्या पिढीची इच्छाच निघून जाईल. प्रचाराच्या वेळी शालीनता ठेवली पाहिजे. असं म्हणत राजीव कुमार यांनी उद्धव ठाकरेंचं सुनावलं. तसंच ज्या नेत्यांनी महिलांचं नाव घेऊन आक्षेपार्ह विधानं केली त्यांनाही सुनावलं आहे.
नेमकं काय घडलं होतं?
उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे औसा मतदारसंघातील उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारासाठी गेले असताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांची बॅग तपासण्यात आली . त्यावरुन, उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला. तसेच, आत्तापर्यंत किती जणांची बॅग तपासली असा सवाल संबंधितांना केला. त्यावर, तुम्हीच पहिले आहात असे उत्तर कर्मचाऱ्यांनी दिले असता, दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक का, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ स्वत:च शुट केला. हीच घटना सलग तीन दिवस झाली. त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते.
दिल्ली विधानसभा निवडणुका जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी, ईव्हीएम मधील छेडछाड, मतदार याद्यांमधील घोळ आणि वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शेवटच्या पाच तासांत मतदानाची टक्केवारी कशी वाढली याबाबतही स्पष्टीकरण दिले. दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर करताना निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, “ईव्हीएममध्ये कोणत्याही त्रुटीचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे ईव्हीएममध्ये व्हायरस किंवा बग असण्याचा तसेच मतमोजणीमध्ये काही छेडछाड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. देशातील उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाने सातत्याने हेच सांगितले आहे की, ईव्हीएम टेम्परिंगचे आरोप निराधार आहेत.” असं राजीव कुमार म्हणाले. दरम्यान राजीव कुमार यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली.