लोकसभा, विधानसभेनंतरही भाजपमध्ये इन्कमिंग सुरुच; 'या' बड्या नेत्याने केला पक्ष प्रवेश (File Photo : BJP)
पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यात केंद्रात आणि राज्यात मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर भाजपचे सरकार सत्तेत आहे. या निवडणुका पार पडल्यानंतरही भाजपमध्ये नेतेमंडळींचे इन्कमिंग अद्याप थांबलेले नाही. असे असताना आता शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे बंधू आणि माजी आमदार पंडीत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही सुरु होत्या. मात्र, आता भाजपप्रवेशाच्या या चर्चा मागे पडल्या आहेत. जयंत पाटील नाही तर दुसरा एक बडा नेता भाजपच्या गळाला लागला आहे. माजी आमदार पंडीत पाटील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे पुत्र आस्वाद पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.
भाजपमध्ये प्रवेश करताच पंडित पाटील यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘मला भांडण करायची गरज नाही. जिल्हा बँक संचालक, जिल्हा परिषद सदस्य, सगळे आज आले आहेत. पंडीत शेट भाजपमध्ये येणे शक्य नव्हते. पण मी धारप साहेब आणि चव्हाण साहेब यांना शब्द दिला होता. शेकापच्या माध्यमातून आम्ही खासदार केले. आमच्या शिडीने अनेक लोक वर गेले पण कार्यकर्ता संपला’.
आम्ही तटकरेंना खासदार केले
गेल्या निवडणुकीत आम्ही सुनील तटकरे यांना खासदार केले. आघाडीमार्फत खासदार झाले, पण आम्हाला ते विसरले. मला अभिमान आहे, भाजप नेते रविंद्र चव्हाण यांना भविष्यात काय पद मिळेल, पण त्यांनी सांगितले की, ‘तुम्ही भाजपमध्ये या, तुमच्या ज्ञानाचा फायदा होईल. मी शब्द देतो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष असेल, असा विश्वासही पंडित पाटील यांनी व्यक्त केला.