संग्रहित फोटो
सासवड : ज्या जमिनीत साधे कुसळ उगवत नव्हते अशा खडकाळ, मुरमाड, ओसाड जमिनी कष्टाने फुलवल्या. वर्षानुवर्षे काबाडकष्ट करून आमच्या आजोबांनी, वडिलांनी कितीही दुष्काळ, संकटे आली तरी त्या न विकता पोटाला चिमटा घेवून जपल्या. आता त्यामध्ये आम्ही विहिरी खोदल्या, पुरंदर उपसा योजनेतून पाईप लाईन करून हजारो रुपये खर्च करून फळबागा लावल्या. आता कुठे आम्हाला कष्टाचे फळ मिळायची आशा दिसत असताना तुम्ही त्यावर विमानतळाच्या नावाखाली नांगर फिरवणार का ? स्थानिक शेतकऱ्यांना भूमिहीन करून विकास करणार, मग धान्य काय विमानात पेरणार का? असे जळजळीत सवाल शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केले आहेत.
शासनाला आमच्या भावना कळवा
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव अशा सात गावात विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादनची प्रक्रिया सुरु आहे. शेतकऱ्यांच्या हरकतीवरील सुनावणीचा शेवटचा टप्पा नुकताच पार पडला. शेवटच्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांनी आपले म्हणणे सादर केले. यावेळी शेतकऱ्यांनी शेतात अनेक प्रकारच्या फळबागा लावल्या असून पोल्ट्रीशेड, कांदाचाळ, जनावरांचे गोठे मोठ्या प्रमाणात असून आपण त्याची प्रत्यक्ष पाहणी करून शासनाला आमच्या भावना कळवाव्या, अशी विनंती केली.
अधिकाऱ्यांकडून शेतीची पाहणी
शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेवून भूसंपादन अधिकारी कल्याण पांढरे यांनी वनपुरी गावातील पाटीलवस्ती वरील शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली. यावेळी तेथील शेतकरी संतोष राजाभाऊ कुंभारकर, ज्ञानदेव कुंभारकर, राजेंद्र मगर, नानासो खेडेकर, शरद कुंभारकर, संजय कुंभारकर, कारभारी बबन कुंभारकर, विकास कुंभारकर, पंडित कुंभारकर, सुनील कुंभारकर यांच्यासह वस्तीवरील शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना विमानतळ प्रकल्प झाल्यास शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल हे सांगण्याचा प्रयत्न केला.
धान्य कुठे उगवणार?
ज्या जमिनीत गवताशिवाय काहीच उगवत नव्हते, त्या जमिनी कष्टाने फुलवल्या. आज तिथे सीताफळ, डाळिंब, अंजीर, नारळ यांच्या फळबागा तयार झाल्या आहेत. कांदा, भुईमुग, गहू, ज्वारी, बाजरी त्याचबरोबर विविध तरकारी पिके, फुलपिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते, शेतकऱ्यांनी स्वकष्टाने विहिरी, बोअर, शेततळी घेतली, हजारो फुट लांब पाईपलाईन नेल्या. मग विमानतळ प्रकल्पासाठी या सर्वांवर नांगर फिरवणार का ? असा प्रश्न उपस्थित केला. मोठमोठ्या प्रकल्पाच्या नावाखाली जमिनीचे संपादन करून उद्योजकांना देणार मग खायला धान्य कोठून मिळणार, विमानात शेती करणार का ? असे प्रश्नही तळमळीने उपस्थित केले आहेत.
संयुक्त बैठक होणार
यापूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबारा उतारावर भूसंपादनाचे शेरे मारल्यानंतर त्यावर हरकती घेण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. त्यावर दोन हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या होत्या. या हरकतीवर पुन्हा नोटीस देवून सुनावणी घेण्यात आल्या. तर उर्वरित शेतकऱ्यांच्या शेतीची शुक्रवारी २७ रोजी सुनावणी प्रक्रिया राबवण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येत्या आठवडाभरात संयुक्त बैठक पार पडणार असून त्यांतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती भूसंपादन उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी दिली.