अलिबाग : अलिबाग तालुक्यातील पोयनाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कुसुंबळे कातळपाडा रोडवर आज चारचाकी व दुचाकी वाहनांची जोरदार टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांनाही नाहक आपला जीव गमवावा लागला.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक २५ जुलै २०२३ रोजी सकाळी ९:३० वाजता MH 06 BW 6320 हा मच्छी ने भरलेला टेम्पो भरधाव वेगाने नागोठण्याच्या दिशेने जात होता. त्याचवेळी MH 06 BZ 9726 या दुचाकी वाहनाने जे. एस. डब्ल्यू येथे नेहमीप्रमाणे मयत आरती भारत पाटील. वय 40 वर्षे तसेच मयत हिराचंद्र दत्तू म्हात्रे वय 50 वर्षे हे दोघे कामास पोयनाड दिशेला जात असताना समोरून येणाऱ्या चारचाकी वाहन चालक दिनेश परदेशी याचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी विरुद्ध बाजूला येत दुचाकीला जोरदार टक्कर दिली व या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले.
घटनास्थळी झालेल्या भीषण अपघाताची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते राजाभाई केणी यांनी घटनास्थळी पोहोचून तत्परतेने आपल्या रुग्णवाहिकेमधून अपघातग्रस्तांना प्राथमिक उपचारासाठी दाखल केले.
तसेच पोलिसांनी पोहोचून पंचनामा केला व पुढील तपासकार्य करीत आहेत. यावेळी सदरील घटनास्थळी पाहिले असता चारचाकी वाहनामध्ये ड्रायव्हरच्या सिट जवळ अर्धवट प्यायलेली दारूची बॉटल दिसत असल्याने चालकाने मद्य पिवून गाडी चालविल्यामुळेच हा भीषण अपघात झाला असून, दोन निष्पाप जीवांचा बळी घेतल्यामुळे आरोपींना कठोरात कठोर शासन झाले पाहिजे, असे मत घटनास्थळी हजर असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ती जिविता पाटील यांनी व्यक्त केले आहे. तसेच मृत्यू झालेल्या व्यक्ती या कुटुंबातील कमावत्या व्यक्ती असल्याने त्यांचे कुटुंब आज उघड्यावर पडले आहे त्यामुळे संबंधितांनी योग्य तपास करून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करीत नुकसान भरपाई मिळवून द्यावी आणि असे न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, अशी मागणी स्थानिकांनकडून होत आहे तसेच झालेल्या प्रकाराबद्दल स्थानिकांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.