छुप्या पद्धतीने होणाऱ्या गर्भलिंग निदान केंद्रावर मोठी कारवाई होणार; सीईओ 'अॅक्शन मोड'वर (फोटो सौजन्य : iStock)
वाशिम : कारंजा शहरातील राठोड मॅटर्निटी अॅण्ड जनरल हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या गर्भलिंग शोधण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही कारवाई वाशिम, कारंजा आणि अकोला आरोग्य विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.12) रात्री आठच्या सुमारास केली. यावेळी 5 गर्भवती महिला गर्भलिंग निदानाच्या प्रतीक्षेत असल्याचे आढळून आल्या. या महिलांपैकी 2 महिला बुलढाणा जिल्ह्यातील, 2 अकोला जिल्ह्यातील आणि 1 महिला वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील रहिवासी आहे.
आरोग्य विभागाला लिंगनिदान होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर, 6 सदस्यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने सापळा रचून एका गर्भवती महिलेला बनावट रुग्ण म्हणून रुग्णालयात पाठवले. तिथे तिची भेट एका एजंटशी झाली, ज्याने तिला लिंग निदानाची हमी देत पैशांची मागणी केली. त्या महिलेकडून मिळालेल्या माहितीनंतर आरोग्य विभागाने तत्काळ छापेमारी केली.
छाप्यादरम्यान, पथकाने सोनोग्राफी मशीन सील केली आणि एजंटकडून 70500 रुपये रोख रक्कम तसेच मोबाइल जप्त केले. सोनोग्राफी मशीनद्वारे बाळाचे गर्भलिंग निश्चित करण्यासाठी आणि ते उघड करण्यासाठी प्री-कन्सेप्टन, प्री-नेटल डायग्नोस्टिक टेक्निक (पीसीपीएनडीटी) कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
अकोला व वाशिम टीममधील डॉ. विजया पवणीकर, डॉ. धनंजय चिमणकर, डॉ. एन. आर. साळुंखे, डॉ. एस. एम. जाधव, अॅड. शुभांगी ठाकरे, अॅड. राधा नरवलिया, ओम राऊत यांच्या पथकाने राठोड मॅटर्निटी अॅण्ड जनरल हॉस्पिटलच्या डॉ. रजनी राठोड एजंट माधव ठाकरे आणि चालक संदीप नवघरे यांच्याविरुद्ध पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत कारवाई केली.
बेकायदेशीर गर्भलिंग निदानाची माहिती देणाऱ्यास एक लाख
प्रसूतीपूर्व निदान तंत्राचा वापर करून बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान हॉस्पिटल करणे, गर्भपात करणे शिक्षेस पात्र आहे. परंतु, त्यानंतरही गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्यात येत आहे. यावर आळा घालण्यासाठी बेकायदेशीर गर्भलिंग निदानाची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. संबंधित डॉक्टर किंवा त्या रुग्णालयाची तक्रार करण्याचे आवाहन केले आहेत.