गर्भलिंगनिदान रोखण्यासाठी डिकॉय ऑपरेशन! ९९ टक्क्यांहून अधिक सोनोग्राफी केंद्राची तपासणी
राज्यात गर्भलिंग निदान रोखण्यासाठी राज्य सरकारकडून ‘डिकॉय ऑपरेशन’ राबवले जात असून, राज्यातील सोनोग्राफी केंद्रांची तपासणी केली जात आहे. राज्यात गर्भलिंग निदान रोखण्यासाठी गर्भधारणेपूर्व व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्याची अंमलबजावणी अधिक कडक करण्यात आली असून, एप्रिल ते डिसेंबर २०२५ या कालावधीत सलग तिमाहीमध्ये ९९ टक्क्यांहून अधिक सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. शासनाच्या आकडेवारीनुसार तपासणीचे प्रमाण सातत्याने ९९ टक्क्यांपेक्षा अधिक राहिले नियमभंगावर ठेवण्यासाठी प्रशासनाचा यंत्रणा अधिक सतर्क झाल्याचे स्पष्ट होते.(फोटो सौजन्य – istock)
सोनोग्राफी केंद्रांसह वैद्यकीय गर्भपात केंद्रांचीही दर तीन महिन्यांनी तपासणी करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी गर्भधारणेपूर्व व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन आढळून आले, त्या केंद्रांविरोधात थेट न्यायालयीन कारवाई सुरू करण्यात आली आहे. डिसेंबर २०२५ अखेर विविध न्यायालयांत शेकडो प्रकरणे दाखल झाल्याची नोंद आहे. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी केवळ मर्यादित न राहता प्रत्यक्ष कारवाईत उतरल्याचे चित्र समोर येत आहे. राज्य शासनाकडून ‘डिकॉय ऑपरेशन’, ऑनलाइन तक्रार यंत्रणा आणि हेल्पलाईनद्वारे नागरिकांच्या सहभागालाही प्रोत्साहन दिले जात आहे.
गर्भधारणेपूर्व व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करताना एप्रिल ते जून २०२५ या पहिल्या तिमाहीत राज्यातील सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीचे प्रमाण ९९.१६ टक्के इतके राहिले. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत हे प्रमाण ९९.६४ टक्के होते. तर ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीत हे प्रमाण ९९.८० टक्के नोंदवले गेले. सलग तीन तिमाहींमध्ये १९ टक्क्यांहून अधिक तपासणी झाल्यामुळे सोनोग्राफी केंद्रांवर प्रशासनाची करडी नजर असल्याचे स्पष्ट होते.
गर्भधारणेपूर्वी व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याची अंमलबावनी करताना केंद्रांना नियमित भेटी देण्याच्या सूचना देण्यात आहेत. संबंधित जिल्ह्यांवर कडक लक्ष ठेवण्यात येत असून नियमित तपासण्यांना प्राधान्य देण्यात येत आहे, त्रुटी आढळून येणाऱ्या केंद्रांना इशाराही देण्यात आला आहे. डॉ. संदीप सांगळे, अतिरिक्त संचालक, राज्य कुटुंब कल्याण.
१२.३५१ सोनोग्राफी केंद्रे
१२,१४८ केंद्रांची तपासणी
१२,३७७ सोनोग्राफी केंद्रे
१२,३४३ केंद्रांची तपासणी
१२,४५४ सोनोग्राफी केंद्रे
१२,४३० केंद्रांची तपासणी






