कर्जत : कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील प्रविण ॲग्रो कोल कंपनीमध्ये भीषण आग लागली. या आगीत ब्रिकेट मशीनसह इतर साहित्य जळून खाक झाले. त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निमगाव डाकू येथील शेतकरी गोरख इंगळे व प्रविण इंगळे यांनी दहा वर्षांपासून प्रविण ॲग्रो कोल कंपनी चालवित आहेत. या कंपनीमार्फत ते पुणे, नगर व कुमकुम येथील एमआयडीसीला बाॅयलरसाठी लागणारे ब्रिकेट पुरविण्याचे काम या कंपनीमार्फत करीत आहेत.
या कंपनीचे संचालक प्रविण इंगळे हे पुणे येथे गेले होते. तर गोरख इंगळे हे जामखेड येथे लग्नाला गेले होते. दुपारी अचानक शाॅकसर्किट होऊन कंपनीत आग लागून पेट घेतला. वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीचा भडका मोठ्या प्रमाणात उडाला. त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत होत्या. इंगळे पिता-पुत्रांना ही वार्ता कळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीने बरेच भस्म केले होते.
कर्जत नगर पंचायत, करमाळा नगरपरिषदचे अग्निशमक बंब दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण फारसे यशस्वी होऊ शकले नाहीत. या आगीत ब्रिकेट मशीनसह बग्याज, कच्चे साहित्य याशिवाय तयार झालेले ब्रिकेट यासह शेडचे मोठ्या प्रमाणात जळून गेल्याने मोठे नुकसान झाले. प्रवीण इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक कोटी दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
आगीची माहिती समजताच आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयातील कर्मचारी संजय म्हस्के यांनी कर्जत, करमाळा, जामखेड व आष्टी तालुक्यातील अग्निशामक यंत्रणा यांना सुचना देऊन तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी रवाना केल्या तर शिवाजी फाळके व सचिन घुले यांनी घटनास्थळी दाखल होवून इंगळे कुटुंबाला धीर दिला.