कोल्हापूर/दीपक घाटगे : मणिपूरसहित देशातील इतर ठिकाणी महिलांच्यावर अत्याचार करणारे मोकाट सुटलेले असताना एक जबाबदार नागरिक या नात्याने प्रायश्चित म्हणून माजी खासदार राजू शेट्टी यांनी आजपासून पासून पुढील ७२ तास अन्नत्याग आंदोलनाला इचलकरंजी येथे सुरुवात केली. मुसळधार पाऊस पडत असतानाही त्यांच्या आंदोलनाला नागरिकांनी उपस्थिती लावून पाठिंबा दिला.
मणिपूरमध्ये मानवी क्रौयाची परिसीमा
मणिपूरमध्ये मानवी क्रौयाची परिसीमा झाली आहे. जवानाच्या पत्नीवरही अत्याचार झाल्याची चित्रफित पुढे आल्याने संतापाची लाट उसळली आहे. हा संदर्भ देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देशभरात महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याने इचलकरंजी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ तीन दिवस अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.
आजपासून अन्नत्याग सत्याग्रहास प्रारंभ
सकाळी ११ वाजता राजू शेट्टी यांनी ७२ तास अन्नत्याग सत्याग्रहास प्रारंभ केला. पहिल्या दिवशी त्यांच्या सोबत महंमद हुसेन मुजावर, विश्वास बालिघाटे, पुरंदर पाटील, राजू निर्मळे आदी चक्री उपोषण मध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे शहराध्यक्ष विकास चौगुले, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बसगोंड बिराजदार, हेमंत वनकुंद्रे, सतीश मगदूम, अण्णासाहेब शहापूरे, जयकुमार कोले,सचिन शिंदे, अविनाश कोरे ,बाळासाहेब पाटील, विद्याधर पाटील, निवृत्ती शिरगुरे यांच्यासह शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.
कोल्हापुरात भरपावसात सत्याग्रह
दरम्यान, कोल्हापुरात पावसाने धुमाकूळ घातला असताना, अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. 1 राष्ट्रीय महामार्गासह 14 महामार्गांची एसटी सेवा बंद करण्यात आली आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक ठिकाणचे जनजीवन ठप्प झाले आहे.
एकूण 12 मार्ग बंद
दरम्यान, जिल्हा परिषदेकडेकडील एकूण २०१ मार्गांपैकी १२ मार्ग बंद आहेत. ग्रामीणमधील १९९७ मार्गांपैकी १८ मार्ग बंद आहेत. त्यामुळे २१९८ मार्गांपैकी ३० मार्ग बंद आहेत. या सर्व मार्गांवर पर्यायी मार्गाने वाहतूक बंद आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील या १४ मार्गावरील एसटी सेवा बंद
कोल्हापूर ते गगनबावडा
रंकाळा ते पडसाळी
रंकाळा ते आरळी
रंकाळा ते चौकी
रंकाळा ते गगनबावडा
चंदगड ते गडहिंग्लज
गडहिंग्लज ते हाजगोळी
गडहिंग्लज ते नेसरी
चंदगड ते बेळगाव
चंदगड ते हेरा
चंदगड ते कानूर
चंदगड ते बुजवडे
चंदगड ते कोल्हापूर
कागल ते पणजी