फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मुंबई : राज्यामध्ये सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र विधान परिषदेमध्ये विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांचे सभागृहातून निलंबन करण्यात आले आहे. यामुळे राज्याचे राजकारण तापले असून विरोधकांनी निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील माफी मागितली आहेत. तसेच अंबादास दानवे यांनी देखील दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता अंबादास दानवे यांचे निलंबन मागे घेणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवराळ भाषा वापरली. भाजप आमदार प्रसाद लाड व अंबादास दानवे यांच्यामधील शाब्दिक चमक विकोपाला गेली. यामध्ये दानवे यांनी सभागृहामध्ये शिवराळ भाषा वापरली. त्यामुळे अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले. सभागृहामध्ये याबाबत ठराव देखील मंजूर झाला. मात्र या प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी महिला व उपसभापती यांची जाहीर माफी देखील मागितली आहे. यानंतर अंबादास दानवे यांनी दिलगिरी व्यक्त करणारे पत्र लिहिले आहे.
गोऱ्हेंना दिले दिलगिरीचे पत्र
सभागृहामध्ये अर्वाच्च भाषा वापरल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणार पत्र विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी लिहिले आहे. त्यांनी स्वतः उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेत हे दिलगिरीचे पत्र सुपूर्द केले आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाचे देखील हे निलंबन मागे घेण्यासाठी हालचाली सुरु आहेत. त्यांची शिक्षा कमी करावी अशी मागणी विरोधक करत आहेत. आमदार अनिल परब यांनी देखील सभागृहामध्ये दानवे यांचे निलंबन मागे घेण्यात यावी अशी विनंती केली. दिलगिरीचे पत्र दिल्यानंतर अंबादास दानवे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
काय घेणार निर्णय?
यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, ‘त्या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी आधीच भूमिका मांडली आहे. माझ्या तोंडून काही शब्द निघाले असतील तर स्वतः माझ्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. सभागृहाचं पावित्र्य राखताना माझ्याकडून काही चुकीचं झालं असेल. हे पावित्र्य राखण्यासाठी माझी सभागृहात दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी आहे,’ असे मत अंबादास दानवे यांनी मांडले. दिलगिरी व्यक्त केल्यानंतर अंबादास दानवे यांचे पाच दिवसांचे निलंबन मागे होणार का आणि नीलम गोऱ्हे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.