अकोला : जिल्ह्यात गेल्या काही वर्षात अवैध शस्त्रांचे आवागमन व वापर वाढला आहे. यात विशेषकरुन देशी कट्टा व तलवारीचे प्रमाण जास्त आहे. यामुळे जिल्ह्यात टोळीयुद्ध भडकण्याची किंवा गुन्हेगारी वाढण्याची शक्यता होती. मात्र, या सर्व हालचालींवर पोलिस दलाची करडी नजर आहे. अशा अवैध शस्त्रांची खरेदी व वापर करणा-या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी जिल्ह्यात १०० खबरी अॅक्टीव्ह केले आहेत.
[read_also content=”वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकासाठी कुचंबना, मूर्तिजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील प्रकार https://www.navarashtra.com/maharashtra/types-in-the-education-department-of-kuchambana-murtijapur-panchayat-samiti-for-medical-reimbursement-nraa-262881.html”]
अवैध शस्त्रास्त्र खरेदी- विक्री करणा-यांच्या मुसक्या आवळणे सुरू आहे. मागील एका वर्षात विशेष पथकाने तीन देशी कट्टे व ४३ तलवारी जप्त केल्या आहेत. देशी कट्टे जिल्ह्यात किंवा परिसरात तयार होत नसून मध्य प्रदेशातून जिल्ह्यात येत आहेत. मध्य प्रदेशातून बुलढाणा जिल्ह्याच्या सिमेवरील गावांमध्ये देशी कट्टे येतात. तेथून खासगी वाहनांनी अकोला जिल्ह्यात अशा शस्त्रांचा प्रवेश होतो. गेल्या काही वर्षात जिल्ह्यात शस्त्रांचे प्रमाण वाढत असल्याची पोलिसांची नोंद आहे.
१५ हजारात देशी कट्टा
सध्या तरुणांना देशी कट्टा, बंदूक, पिस्तूल चे आकर्षण आहे. देशी कट्टा १५ ते २० हजारात तर विदेशी बनावटीची बंदूक २५ हजारात उपलब्ध होते. विदेशी बंदुक वजनाने हलकी असल्याने त्याला मागणी जास्त आहे. काही नागरिक राजस्थान किंवा इतर राज्यात जातात व तेथूनही विदेशी बनावटीच्या बंदुका आणत असल्याची पोलिस सूत्रांची माहिती आहे.
[read_also content=”८६ गावांना दूषित पाण्याचा विळखा ! ग्रामपंचायतींचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ https://www.navarashtra.com/maharashtra/disposal-of-contaminated-water-to-86-villages-gram-panchayats-play-with-the-health-of-citizens-nraa-262842.html”]
गुन्हेगारी नियंत्रणासाठी समुपदेशन
शिकलगिरी समाजातील नागरिकांचा तवा, खलबत्ते तयार करण्याचा व्यवसाय आहे. मात्र, गरिबीमुळे त्यातील काही जण तलवारी, सुरे यासारखे शस्त्रास्त्र तयार करतात. अशी शस्त्रास्त्र तयार करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे आम्ही वारंवार शिकलगिरी समाजातील नागरिकांना असे शस्त्र तयार न करण्यासाठी समुपदेश करीत आहोत, अशी माहिती पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी दिली.
कसा लागतो शोध ?
अनेकदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरूण किंवा माथेफिरू सोशल मिडीयावर शस्त्रांचे डीपी ठेवतात. तसेच काही जण तलवारीने केक कापतात. त्यांचे व्हिडीआे व्हायरल झाल्यानंतर पोलिस अशा व्यक्तींचा शोध घेतात. त्यानंतर तलवार कुठून आली याची माहिती काढून शस्त्रास्त्र जप्त करण्यात येते. सखोल चौकशी नंतर शस्त्र निर्मिती करणारे, पुरवठा करणारे सर्वांचा छडा लागतो.
घरात बंदूक ठेवणे घातकच.. विलास पाटील, विशेष पथकाचे प्रमुख
अनेक तरूण अवैधरित्या परवाना नसताना केवळ स्वस्तात मिळते म्हणून देशी कट्टा किंवा विदेशी बंदूक खरेदी करतात. मात्र, आरोपी घरी नसताना पोलिसांचा छापा पडल्यास घरातील इतर सदस्यांचा आरोपीमध्ये समावेश होऊ शकतो. त्यांचीही चौकशी होते. त्यामुळे नाहक त्यांना त्रास होतो. भविष्याचा विचार करून अशा घातक शस्त्रांपासून तरूणांनी दूरच राहावे.






