गोंदिया : आपल्या देशात तांदळासह अनेक अन्नधान्यांचा मोठा साठा आहे. साठवणुकीसाठी गोदाम नाही. अशात धान उत्पादक शेतकऱ्यांची सध्याची स्थिती पाहता भविष्य चांगले दिसत नाही. असे चिंताजनक प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ३४९ कोटी रुपये खर्चाच्या तीन कामांच्या उद्घाटनासाठी रविवारी २९ मे रोजी गडकरी गोंदियात आले होते. यावेळी धान (तांदूळ) खरेदीचा सरकारी पातळीवरील मान वाढवण्याच्या मुद्द्यावर व सद्यस्थितीवर त्यांनी गांभीर्याने भाष्य केले.
ते म्हणाले की हे मी हवेत बोलत नाही. तर सत्यता आहे. ज्या पिकाचे उत्पादन भरपूर आहे तेच पिक न घेता शेतकऱ्यांनी इतर पिकाकडे वळले पाहिजे, भाताबरोबरच आता तेलाच्या उत्पादनावरही भर दिला पाहिजे. देशात तेलाची गरज आहे. भातापासून तांदळाचा कोंडापासून तेलाची निर्मिती होते. तर सोयाबीन, मोहरी, सूर्यफुलाची लागवड करावी. उसाच्या रसापासून इथेनॉल, तांदळाच्या दाण्यापासून इथेनॉल बनवण्यावर आमचा भर आहे. सध्या पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल वापरण्यात येत असून त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. असे म्हणतात की जो पाप करतो तो साखर कारखाना काढतो. पण काहींनी माझ्या गळ्यात हे लटकवून पळून गेले. तेव्हा त्यांना मी सांगतो की, मी जे काम करतो ते सोडत नाही.
आजघडीला साखर कारखाना चालतच आहे. आम्ही तांदळाच्या फ्लेक्सपासून इथेनॉल तयार करण्याच्या प्रक्रियेवर काम करू. यासाठी ६०० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. सुमारे ५ हजार लोकांना रोजगार मिळणार असल्याचे सांगत त्यांनी माझ्याकडे माझा ट्रॅक्टर सीएनजी आहे आणि वर्षभरात १ लाख रुपयांची बचत होत आहे. तेव्हा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही ट्रॅक्टर सीएनजी करून बचत करावी, असा सल्लाही यावेळी दिला.
एका तासात गोंदिया ते नागपूर
मेट्रो रेल्वेचा विस्तार आता गोंदिया पर्यंत करण्यात येणार असून त्यानंतर भविष्यात चंद्रपूरलाही जोडण्यात येईल. म्हणजेच मेट्रो नागपूर ते गोंदिया व गोंदिया ते चंद्रपूर व चंद्रपूर ते नागपूर अशी धावेल. या ट्रेनने प्रवाश्यांना गोंदियावरून नागपूरला येण्यासाठी फक्त १ तास ५ मिनीटांचा वेळ लागणार आहे. तर येत्या ६ महिन्यात या योजनेवर काम सुरू होणार असल्याचे गडकरी म्हणाले.
@nitin_gadkari @OfficeOfNG