मुंबईः गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मुंबई परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव मंडळांच्या मूर्तीचे आगमन होत आहे. या आगमन सोहळ्यात सर्वांना वेध लागले असते आगमनाधीश चिंचपोकळी च्या चिंतामणी चा आगमन सोहळ्याची. या सोहळ्याला दरवर्षी लाखो गणेश भक्तांची उपस्थिती असते. डोल ताश्याच्या गजरामध्ये आणि भक्तांच्या जयघोषामध्ये हा सोहळा पार पडतो. त्यामुळे हा सोहळा मुंबईतील गणेशोत्सवाची वेगळी ओळख झाला आहे.
चिंतामणी कोणत्या रुपात असणार याबद्दल भक्तांमध्ये उत्सुकता
भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचपोकळी च्या चिंतामणी चा या वर्षीचा आगमन सोहळा शनिवार ३१ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २ वाजता गणेश टॉकीज, चिंचपोकळी येथून होणार असून यावर्षी चिंतामणी कोणत्या रूपात दर्शन देणार आहे याची उत्सुकता चिंतामणी भक्तांना लागून राहिली आहे.
वाद्य पथक आणि जय जवान गोविंदा पथकाची सलामी
मूर्तिकार विजय खातू मूर्तिकार रेश्मा खातू यांच्या संकल्पनेतून चिंचपोकळीचा चिंतामणी साकार होत आहे.यावर्षीच्या आगमन सोहळ्यात कलेश्वरनाथ,सोनू मोनू बिट्स, कामतघर -खोणी ब्रास बॅण्ड, भिवंडी गांव,जोगेश्वरी बिट्स,सातरस्ता बिट्स,श्रीगणेशनाद वाद्य पथक पुणे, यांचे वादन होणार आहे. आगमन सोहळ्याचे अजून एक आकर्षण म्हणजे मानवी थरांचा विश्वविक्रम करणारे, प्रो गोविंदा विजेते ‘जय जवान गोविंदा पथक’ चिंचपोकळीच्या चितांमणीला मानवी थरांची सलामी देणार आहेत.
मंडळाचे भक्तांना आवाहन
यावेळी चिंतामणी भक्तांनी शक्यतो वाहने आणू नयेत तसेच स्वयंशिस्त पाळून पोलिसांनी दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत यांनी केले आहे.
चिंचपोकळीचा चितांमणीचा इतिहास
लालबाग, परळ, चिंचपोकळी हा गिरणी कामगारांची वस्ती असणारा परिसर. या परिसरातील तरुणांनी एकत्र येत 6 सप्टेंबर 1920 रोजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. मंडळाने १९४४ साली रौप्यमहोत्सव साजरा केला. १९५६ साली या गणेशोत्सव मंडळाची घटना तयार केली गेली. या घटनेमधेय मंडळाचे चिंचपोकळी हे नाव बदलून चिंचपोकळी उत्सव मंडळ असे नामकरण केले गेले. गणेशोत्सव मंडळ हे वर्षातील मर्यादित कालावधीसाठी असते. मात्र मंडळाच्या समाजकार्याचा कालावधी मर्यादित नव्हता. सामाजिक क्षेत्रात वर्षभर मंडळाने कार्यरत व्हावे या हेतूने हे नामकरण करण्यात आले. २०१९ साली या मंडळाला १०० वर्षे पूर्ण झाली. मंडळाकडून वर्षभर वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.