मुंबई/नीता परब: गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आणि वेगळी ओळख असणारी मुंबापुरी गणेशोत्सवासाठी सजली आहे. मुंबईतील आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा, भारतातील सर्वात श्रीमंत गणपती मूर्ती म्हणून ओळखला जाणारा मुंबईतील किंग्ज सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाने यंदा रेकॉर्ड ब्रेकिंग गणेशोत्सव विमा पॉलिसी काढली आहे. यंदा जीएसबीच्या बाप्पाचे विक्रमी ४००.५८ कोटी रुपयांचा गणेशोत्सव विमा संरक्षण काढण्यात आला आहे. दि न्यू इंडिया इन्सुरन्स कॉ लिमिटेड ( The New India Insurance Co. Ltd) द्वारे हा विमा संरक्षण काढण्यात आला आहे. मागील वर्षी विक्रमी ३६०.४० कोटी रुपयांचे विमा संरक्षण काढला होता.
दर वर्षी गणेशोत्सव मुंबईसह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लाखो भाविक मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा करतात. यातच मोठ्या मंडळात लाखो भाविक देखील आपल्या बाप्पाच्या दर्शनाला येत असतात. याच सगळ्या गोष्टींची काळजी घेत मंडळांनी विमा कवच काढण्याचा निर्णय घेतात.
या तारखेला होणार विराट दर्शन…
सालाबादप्रमाणे या वर्षी देखील बाप्पाचे विराट दर्शन होणार असून या वर्षी ५ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ७.३० वाजता होणार आहे. तर गणेशोत्सव ७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर मध्ये उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले.
मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती अशी ख्याती असलेल्या मुंबईतील जीएसबी सेवा मंडळ, किंग सर्कल यांनी चक्क ४०० कोटींपेक्षा अधिकचा विमा कवच काढण्याचा निर्णय घेतला आहे. जीएसबी बाप्पाला ६६ किलो पेक्षा अधिक सोनं आणि ३०० किलो पेक्षा अधिक चांदीचे दागिने असतात. पाच दिवसांच्या या उत्सवात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.येणारे भाविक, कार्यकर्ते, बाप्पाचे दागिने अश्या सर्व गोष्टींची सुरक्षता लक्षात घेता मंडळाने हा निर्णय घेतला आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अमित पै यांनी दिली आहे.
जीएसबी सेवा मंडळाचा पर्यावरणस्नेही गणेशोत्सव
जीएसबी गणपतीची मूर्ती ही पर्यावरणपूरक आहे. या मूर्तीची निर्मिती विशिष्ट नैसर्गिक चिकणमाती (शाडू माती), गवत आणि नैसर्गिकरित्या काढलेल्या पाण्याच्या रंगांनी करण्यात आली आहे. कागदाचा होणारा वारेमाप वापर रोखण्यासाठी कागदी पावत्यांऐवजी डिजिटल होण्याच्या मोहिमेला मंडळाने सुरुवात केली आहे.अशी मोहीम राबविणारे हे एकमेव गणेशोत्सव मंडळ आहे.
दरवर्षी जीएसबी गणपतीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढत आहे. बाप्पाच्या दर्शनाला येणारा भाविकाला दर्शनाबरोबर विशेष प्रसादाचाही लाभ दिला जातो. नवसाला पावणारा गणपती म्हणून आता जीएसबीचा गणपती प्रसिद्ध होऊ लागल्याचंही मंडळाचे अध्यक्ष अमित पै यांनी सांगितले. विशेष म्हणजे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कुठलाही त्रास किंवा असुविधा होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक सुरक्षा रक्षक पोलीस कर्मचारी येथे तैनात करण्यात येणार आहे.