फोटो सौजन्य : iStock
अमरावती : इमाननगरात अवैधरित्या गॅस रिफीलिंग व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर अमरावती पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शनिवारी (दि. 15) धाड टाकून पर्दाफाश केला. शहजाद परवेज अब्दुल झहीर (वय 37 रा. इमामनगर, नागपूरी गेट) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून 23 गॅस सिलिंडर, रिफिलिंगचे साहित्य, दोन ऑटो व वजन काटा असा एकूण 2 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी नागपुरी गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
15 फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेच्या पोलिसांना लालखडी परिसरातील इमामनगरात घरगुती वापराचा एलपीजी गॅस सिलिंडरमधून अवैधरित्या ऑटोमध्ये फिलिंग होत अशी माहिती मिळाली. या माहितीवरुन गुन्हेने घटनास्थळी धाड टाकली. त्यावेळी तेथील टीनाच्या शेडमध्ये एक व्यक्ती गॅस रिफीलिंग मशीनने एका प्लास्टिक पाईपच्या सहाय्याने ऑटोमध्ये गॅस भरत असताना मिळून आला. त्यावेळी ठिकाणी दोन ऑटो हे गॅस भरण्यासाठी आलेले होते. आरोपी हा घरगुती वापराच्या सिलिंडरमधून ऑटोरिक्षात रिफीलिंग करत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी आरोपी शहजाद परवेज अब्दुल झहीर याला ताब्यात घेतले.
दोन ऑटोरिक्षासह 23 सिलिंडर जप्त
याप्रकरणात आरोपीविरुद्ध नागपुरी गेट ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन 55 हजार रुपये किमतीचे 22 नग भारत कंपनीचे घरगुती भरलेले सिलिंडर, 2 हजार रुपये किंमतीचे एक नग भारत कंपनीचे घरगुती खाली सिलिंडर, 5 हजार रुपये किंमतीचे एक पिवळ्या रंगाची हाफ हॉर्स पॉवरची गॅस भरण्यासाठी वापरत असलेली मशीन, 5 हजार रुपये किंमतीचा एक इलेक्ट्रिक वजन काटा, 2 लाख रुपये किंमतीची ऑटो असा एकूण 2 लाख 67 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
रिक्षामध्ये गॅस भरताना आरोपी जाळ्यात
कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कुरुंदवाड येथील गोलंदाज मळा येथे घरगुती सिलिंडर गॅसमधून बेकायदेशीररित्या रिक्षामध्ये गॅस भरून देण्याचे साहित्य सापडल्याने संशयित आरोपी तोहीद परवेज गोलंदाज (रा. दत्त कॉलेज रोड, गोलंदाज मळा, कुरुंदवाड) यास मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण चे पोलीस हेड कॉन्स्टेबल अबूबकर अब्दुलगणी शेख यांनी कुरुंदवाड पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला.






