कोल्हापूरच्या गोकुळ निवडणूक 2025 निकाल नवीद मुश्रीफ यांची अध्यक्षपदाची निवड झाली (फोटो - सोशल मीडिया)
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अध्यक्ष पदाची निवड आज संघाच्या कार्यालयात पार पडली. यावेळी संचालक नविद मुश्रीफ यांची सर्वांनमूते निवड करण्यात आली. या निवडीनंतर मुश्रीफ समर्थकांनी एकच जल्लोष केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये थेट हस्तक्षेप केल्याने महायुतीचा पहिल्यांदा अध्यक्ष झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर गोकुळचे राजकारण ढवळून निघाले होते. त्यामुळे अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? याची चर्चा रंगली होती. गोकुळच्या अध्यक्षपदी सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आले होते. मात्र, पुन्हा एकदा अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप करत महायुतीचा अध्यक्ष झाला पाहिजे, अशी भूमिका घेतल्याने गुरुवारी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनामध्ये अडीच तास बैठक झाली. या बैठकीमध्ये नेत्यांनी चर्चा करत यामध्ये नाव ठरवत बंद लिफाफ्यातून ज्येष्ठ संचालक माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे ते नाव सुपूर्द केले होते. आज तो लिफाफा खोलण्यात आला. नविद मुश्रीफ परदेशात असल्याने त्यांना तातडीने कोल्हापुरात बोलवण्यात आले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गोकुळ अध्यक्षपदावरून बरीच चर्चा रंगली होती. या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव गोकुळ संचालक नविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दरम्यान नविद यांच्या निवडीला हसन मुश्रीफ यांनी विरोध केला होता. मात्र, त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे गोकुळमध्ये राज्यपातळीवरील हस्तक्षेप पहिल्यांदाच दिसून आला.
कोल्हापूर जिल्हा बँक आणि गोकुळ अध्यक्षपद घरी आल्याने हसन मुश्रीफ यांची जिल्ह्याच्या राजकारणावर कमांड वाढली आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ आहेत. दोन्ही संस्थांचा कारभार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या थेट चुलीशी जोडला गेला आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी सत्ता जिल्ह्यातील पुढाऱ्यांना हवी हवीशी असते. राज्यात महायुती असल्याने सतेज पाटील यांची कोल्हापूरमध्येच कोंडी करण्याचा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून सुरु आहे. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यातील समझोता एक्स्प्रेस राजकारण सुद्धा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. अरुण डोंगळे यांचं बंड शांत करण्यात आले तरी महाडिक गटाच्या कोल्हापूर-मुंबई फेऱ्याही सुरु होत्या. त्यामुळे गोकुळमध्ये वेगळं काही घडणार का? अशीही चर्चा रंगली होती. मात्र, संचालकांनी एकजूट दाखवल्याने त्याचा फारसा परिणाम झाला नाही. तर राज्यस्तरीय नेत्यांनी महायुतीचा अध्यक्ष करून महाविकास आघाडीला यापुढे कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे हे आजच्या निवडीवरून दिसून आले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अध्यक्ष निवडीवरुन शह-काटशहाचे राजकारण,सत्ताधारी आघाडीतील अस्वस्थता, वरिष्ठ नेत्यांचा हस्तपेक्ष आणि नेते मंडळीसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांची निवड झाली. गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध प्रकल्प येथील सभागृहात शुक्रवारी निवडीची प्रक्रिया पार पडली.
गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा की महाविकास आघाडीचा? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. अध्यक्ष निवडीवरुन काथ्याकूट करण्यात आला. नेते मंडळींनी संचालकासोबत बैठक घेऊन, अध्यक्षपदासाठी नाव निश्चित केले आहे. शुक्रवारी बंद लखोटयातून ते पाठविले जाईल असे संचालकांना सांगितले होते .गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी दुपारी तीन वाजता बैठक झाली. तत्पूर्वी सत्ताधारी संचालक मंडळाची बैठक दुपारी दोन वाजता गोकुळच्या सभागृहात झाली. नेते मंडळींनी, पाठविलेला लखोटा ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्याकडे होता. संचालक पाटील यांनी सत्ताधारी आघाडीच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी यांचे नाव निश्चित केल्याचे जाहीर केले. याप्रसंगी विद्यमान चेअरमन अरुण डोंगळे, संचालक सुजित मिणचेकर, यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. तत्पूर्वी अजिंक्यतारा येथे गोकुळ मधील सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्याकडे आदेश पदाच्या नावाचा लखोटा सुपूर्द केला. दुपारी तीन वाजता गोकुळच्या मुख्य कार्यालयात अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी नविद मुश्रीफ यांच्या नावाला ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी सुचक तर अरुण डोंगळे हे अनुमोदक आहेत. निवडीनंतर बोलताना मुश्रीफ म्हणाले, सगळ्या नेतेमंडळींच्या सहकार्याने आपणाला तरुण वयात मोठी जबाबदारी मिळाली आहे. दूध उत्पादकांच्या हितासाठी आपण कायम कार्यरत राहो. मी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे गोकुळ दूध संघाची गाडी वापरणार नाही असे सांगितले.
या नावावर महायुतीच्या नेत्यांचा आक्षेप
गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदी नविद मुश्रीफ यांच्या निवडीचा लखोटा राजश्री शाहू आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांना दिला होता. हा लखोटा सभेच्या वेळी खोलण्यात आला असता नविद मुश्रीफ यांचे नाव चेअरमन पदासाठी सुचवण्यात आल्याचे यावरून दिसून आले. अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्यातील नेत्यांनी अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव निश्चित केले होते. मात्र त्यांच्या या नावावर महायुतीच्या नेत्यांनी आक्षेप घेतला होता. चुयेकर हे सतेज पाटील यांचे खंदे समर्थक असल्याने त्यांना अध्यक्ष करू नका असा थेट आदेश मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी दिल्याने त्यांचे नाव मागे पडले होते. त्यामुळे पालकमंत्री आबिटकर, शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे यांच्यासमोर धर्मसंकट उभा राहिले होते. आघाडी धर्म पाळायचा की नेत्यांचा आदेश पाळायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांचे नाव पुढे आले आणि त्यांची निवड झाली.