(फोटो सौजन्य-AI एआय)
प्रदूषणावर आळा घालण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे नागरिकांचा ई-वाहनांकडे कल वाढत असून, जिल्ह्यात सध्या ३ हजार ३०२ इलेक्ट्रिक वाहनांची नोंद उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे आहे. यात ई-दुचाकी, चारचाकी, प्रवासी रिक्षा आणि मालवाहतूक वाहनांचा समावेश आहे.
दुचाकींच्या वाढत्या किमती आणि पेट्रोलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना वाहनांचा खर्च परवडणे कठीण होत आहे. त्यामुळे ई-वाहनांची संकल्पना हळूहळू लोकप्रिय होत आहे. गोंदिया जिल्ह्यातही गेल्या काही महिन्यांत इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत भर पडली आहे. ई-दुचाकींसोबतच ई-चारचाकी आणि ई-रिक्षाही रस्त्यांवर धावताना दिसत आहेत. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात २ हजार १८ आणि ४१० तीनचाकी इलेक्ट्रिक वाहनांचीनोंद आहे. या वाहनांच्या वाढत्या वापरामुळे इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यास आणि प्रदूषण नियंत्रणास मदत होते.
पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०० रुपयांपेक्षा अधिक असल्याने प्रवासी रिक्षाचालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा भाग इंधनावर खर्च होत असल्याने अनेक चालक ई-रिक्षांकडे पर्याय म्हणून पाहत आहेत. एकदा चार्ज केल्यानंतर काही इलेक्ट्रिक वाहने ८० किलोमीटरपर्यंत धावू शकतात. मात्र, वाहनाची क्षमता आणि कंपनीनुसार ही मर्यादा बदलते.
नागरिकांच्या मते, नवीन इलेक्ट्रिक वाहने बाजारात दाखल झाल्यानंतर त्यांच्या खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला होता. मात्र, सध्या हा कल काही प्रमाणात कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. तरीही दरवर्षी इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे.
टाटा पंच EV झाली महाग! किंमतीत ₹20,000 पर्यंत वाढ, जाणून घ्या नवीन दर
ई-वाहनांची संख्या वाढत असली, तरी चार्जिंग स्टेशनची उपलब्धता हा महत्त्वाचा प्रश्न आहे. विशेषतः ग्रामीण भागात सार्वजनिक चार्जिंग सुविधांचा अभाव असल्याने वाहनधारकांना घरगुती वीजपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागते. चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी आवश्यक वीजजोडणी, पुरेशी विद्युत क्षमता आणि पायाभूत सुविधांची उपलब्धता महत्त्वाची ठरते. यादरम्यान, रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि बाजारपेठ परिसरात इलेक्ट्रिक वाहनांची वर्दळ वाढत आहे. मात्र, काही वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन होणे, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे ई-वाहनांच्या वाढत्या वापरासोबत चार्जिंग सुविधांचा विस्तार, सुरक्षित वाहतूक आणि नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.






