File Photo : Harshvardhan Patil
इंदापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच इंदापूरमध्ये आमचा स्वाभिमान, आमचे विमान, आमचे आता ठरले, तयारी लागा, अशा आशयाचे बॅनर झळकले आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी हे बॅनर लावल्याची चर्चा आहे. यापूर्वी हर्षवर्धन पाटील दोनदा विमान चिन्हावर अपक्ष निवडणूक लढले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक हर्षवर्धन पाटील अपक्ष लढणार का?, अशा चर्चेला उधाण आले आहे.
इंदापूर मतदारसंघात सध्या अजित पवार गटाचे नेते दत्तात्रय भरणे आमदार आहेत. तर भाजप नेते हर्षवर्धन पाटीलही इंदापुरातून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे ही जागा कोणाला सुटणार, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. मात्र, महायुतीचे ज्येष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, असे दत्तात्रय भरणे म्हणाले.
भरणे-पाटील संघर्ष शिगेला
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून हर्षवर्धन पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्तात्रय भरणे मैदानात उतरवले होते. या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. दत्तात्रय भरणे यांनी पाटलांचा 3,110 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि भरणे यांच्यामधील संघर्ष गत 5 वर्षात वाढतच गेला.