सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सर्व श्रेय निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचे आहे. मतचोरी, बोगस मतदान आणि SIR च्या माध्यमातून विरोधकांचे मतदार वगळण्याने भाजपा व मित्रपक्षाचा विजय झाला आहे, असे म्हणत बचेंगे तो और भी लढेंगे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांचा पदग्रहण सोहळा टिळक भवन येथे पार पडला. या सोहळ्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष डॉ. अनिल जयहिंद, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव जितेंद्र बघेल, सहप्रभारी बी. एम. संदीप, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सचिन नाईक, राजेंद्र राख, सरचिटणीस दादासाहेब मुंडे, रामहरी रुपनवर, शाह आलम शेख, पल्लवी रेणके आदी उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर प्रसार माध्य़मांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, बिहारच्या निकालानंतर सत्ताधारी जे आरोप करत आहेत त्यात काहीही सत्य नाही ते निराधार आहेत. पाच वर्ष गरिब जनतेकडे दुर्लक्ष करून निवडणुकीच्या तोंडावर महिलांना दिलेले १० हजार रुपये याचाही परिणाम झाला का, यावर चर्चा होईल. पण ज्या पद्धतीने निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला निवडून आणण्यासाठी काम करत आहे हे पाहता हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. देशाला आता टी. एन. शेषन सारख्या निवडणूक आयुक्तांची गरज आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
ज्येष्ठ नेते, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, ओबीसी समाजातील छोट्या छोट्या जातीकडे लक्ष देण्याची गरज आहे, त्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहचले पाहिजे. लहान घटकांना एकत्र करून संघटनेची ताकद वाढवा. काँग्रेस व राज्यघटनेचा विचार एकच आहे, हा विचार समतेचा आहे आणि आपल्या संत महंतानी जे सांगतिले तेच राज्य घटनेत आहे. देश सध्या एका संकटातून जात असून, जो लढतो त्याचा इतिहास लिहिला जातो. आज राहुल गांधी देश, लोकशाही व राज्यघटना वाचवण्याची लढाई लढत आहेत या लढाईत सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन थोरात यांनी केले.






