इंदापूरमध्ये कोण जिंकणार (फोटो- ट्विटर)
इंदापूर/सिद्धार्थ मखरे: काल केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. कालपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीची घोषणा होताच राज्यात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी बैठकांवर बैठका घेत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे इंदापूरची समीकरणे बदलली आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी इंदापूर तालुक्यातील ३ लाख ३६ हजार ६४३ मतदार विधानसभा निवडणुकीस सामोरे जाणार आहेत. तिरंगी लढतीचे सावट या निवडणुकीवर आहे. ती दुरंगी करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार कोणती युक्ती योजणार याची उत्सुकता तालुक्यातील मतदारांना लागून राहिल्याचे सध्याचे चित्र आहे.
दहा वर्षाच्या राजकीय वनवास संपवण्यासाठी ‘मी परत येईन’ हे वाक्य उराशी बाळगत,शरद पवार यांच्या पक्षाबरोबर समझोता करुन,मतांची बेगमी करण्यासाठी तडफेने निघालेले हर्षवर्धन पाटील व दहा वर्षांत केलेली कामे आपली सत्ता अबाधित ठेवतील या विश्वासाने विधानसभेचा गड काबीज करण्याचे स्वप्न पहाणाऱ्या आ.दत्तात्रय भरणे या दोघांना ही आप्पासाहेब जगदाळे,प्रवीण माने व भरत शहा यांच्या तिसऱ्या आघाडीने विचार करण्यास भाग पाडल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे.