File Photo : Heavy Rain
पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी (दि.13) मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 64 हजार क्युसेक झाली होती. धरणातील पाणीसाठा 40.43 टीएमसी झाला आहे. कोयना भागातील नेचल गावाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाने 2 हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे.
पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ३८ हजारवरून रविवारी ६ तासात ६४ हजार क्युसेक झाली होती. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल ५ टीएमसीने वाढ झाली. धरणात सध्या ४०.४३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्राबरोबर कोयना भागात मुसळधार पावसाची रिपरिप चालू असल्याने भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुसळधार पावसामुळे कोयना भागातील नेचल या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने हा रस्ता पाण्याखाली गेला. परिणामी, प्रशासनाने वाहतुकीस हा रस्ता बंद केला होता. दरम्यान, सायंकाळी उशिरा पावसाचा जोर काहीसा ओसरल्यावर या रस्त्यावरील पाणी कमी झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
पाटण बसस्थानकात व दुकानांत पाणी
शहरातून जाणाऱ्या विजापूर-गुहागर राज्य महामार्गावर असणाऱ्या पाटण बसस्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने काही वेळ बस वाहतूक व जनजीवन विस्कळीत झाले होते. बसस्थानकाशेजारील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
नेरळे फाट्यावरील काही दुकानात पाणी शिरून आर्थिक नुकसान झाले. तसेच पाटण-मोरगिरी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक काहीकाळ ठप्प झाली.
सोमवारी सकाळी पावसाची आकडेवारी
सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासांत कोयनानगर १२२ (१९८२ ), नवजा २७४ (२२९९), महाबळेश्वर ९९ (१७५२) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर ओसरला असून, जनजीवन पूर्वपदावर येत आहे.






