Maharashtra Rain : रायगड, रत्नागिरीसह राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज (फोटो सौजन्य-X)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यातील अनेक ठिकाणी उघडीप दिल्याचे पाहिला मिळत होते. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होताना दिसून आला. त्यानंतर आता मंगळवारी (दि.24) सकाळपासूनच पुण्यासह परिसरात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याचेही दिसून आले आहे. दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकण किनारपट्टी आणि पावसाची महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहत आहे. सह्याद्री पर्वत रांगेत मुसळधार पाऊस सुरू असल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
दरम्यान, सोमवारी संध्याकाळी हवामान विभागानेही पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यामध्ये पुढील 24 तासांत पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग येथे बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असेही सांगण्यात आले होते. त्यानंतर आता हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे.
कोल्हापूर, सांगलीला पावसाचा इशारा
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.