संग्रहित फोटो
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर (Rain in Satara) पुन्हा वाढला असून, जिल्ह्याच्या पश्चिम भागात रिपरिप अजूनही कायम आहे. सातारा शहराजवळील आणि कास पठाराचे सानिध्य लाभलेला देशातील सर्वात उंच असलेला भांबवली वजराई धबधबा पुन्हा एकदा वाहू लागला आहे.
सातारा शहरासह जिल्ह्याच्या पूर्व भागात शनिवारी सकाळी पावसाने थोडी उघडीप दिली तरी पश्चिम भागात मात्र दिवसभर पाऊस जोर पकडला होता. मात्र, शुक्रवारी रात्रीपासून पावसाने जोर पकडला. सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावळी या तालुक्यासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे पेरणीसह भाताच्या मागणीच्या कामांना वेग आला आहे.
पावसाच्या जोरामुळे विविध तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे . तेथील ओढे, नाले-नद्या ओसंडून वाहत आहेत. पावसामुळे घाट रस्त्यावर छोट्या मोठ्या दरडी कोसळत आहेत. सातारा ठोसेघर मार्गावर बोरणे घाटाच्या हद्दीमध्ये दरड कोसळण्याचे प्रकार घडत असल्याने तेथील वाहतुकीवर परिणाम झाला असून, बांधकाम विभागाने तातडीची मदत यंत्रणा तेथे रवाना केली. सज्जनगड परिसरामध्ये दरडी कोसळून यासाठी मेटल पिचिंग करण्याचा प्रस्ताव पुढे आला.
मान्सूनच्या आगमनामुळे पश्चिम भागातील डोंगररांगांमध्ये वजराई भांबवली. या ठिकाणच्या धबधबे प्रवाहित झाले असून भांबवली वजराई धबधबा तीन टप्प्यात कोसळत आहेत. पावसाळी पर्यटन बहरू लागले असून, पाऊस शेतीस पूरक असल्याने भात लागणीसह खरीपातील पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात मात्र अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने हा भाग कोरडाच आहे.
दहिवडी खंडाळा कोरेगाव पूर्व इत्यादी भागांमध्ये रिमझिम पाऊस पडत असून, म्हणावा तसा पावसाला जोर नाही. कोयना, कण्हेर, धोम, बलकवडी, मोरणा गुरेघर तारळी या धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कोयना धरणामध्ये शनिवारी सकाळी 76 मिलिमीटर नवजा येथे 89 महाबळेश्वर मध्ये 135 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.