File Photo : Rain
पुणे : गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने दोन दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे. पुणे, मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे बाहेर पडणेही अवघड झाले आहे. रस्त्यांवर पाणीच पाणी दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून पुणे, साताऱ्याला ‘रेड अलर्ट’ दिला आहे. तर काही भागांत यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Rain News: पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार; २६ ते ३० तारखेदरम्यान कसे असणार वातावरण?
हवामान विभागाने 20 ऑगस्टनंतर पाऊस पुनरागमन करेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार, आता पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाने ऑगस्टअखेर चांगला जोर पकडला आहे. मराठवाडावगळता राज्याच्या इतर भागात दमदार पाऊस सुरू आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात मोसमी वारे जोरात वाहत असून, त्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळेॉ राज्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून शुक्रवारपासून मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे.
‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
25 ऑगस्ट रोजी पुणे, साताऱ्याला रेड अलर्ट दिला आहे. या काळात अतिवृष्टीसह पाऊस होऊ शकतो. तर, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, नाशिक,धुळे, नगर, नंदुरबार, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
राज्यात मुसळधार पाऊस होत असताना महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत पसरले आहे. त्यामुळे राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हेदेखील वाचा : Mumbai Rain: पुढील २४ तास मुंबईकरांसाठी महत्वाचे; हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा