Karad News : पालकमंत्री शंभूराज देसाईंनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती; दिले 'हे' महत्त्वपूर्ण आदेश
कराड : कराड शहरातील रखडलेले विकास प्रकल्प, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, भुयारी गटार योजना, पूररेषा व शहर हद्दीचे प्रश्न याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली कामे पुढील एका वर्षात पूर्ण झाली पाहिजेत. अन्यथा जबाबदारी थेट अधिकाऱ्यांवर निश्चित केली जाईल, असा कडक इशाराही त्यांनी दिला. नगराध्यक्ष व नगरसेवकांना यासाठी जबाबदार धरले जाणार नाही. त्यामुळे अधिकारी वर्गाने ‘अलर्ट मोड’मध्ये काम करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या चौथ्या दिवशी शहराच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शासकीय विभागांची आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हेदेखील वाचा : Amravati Election 2026 : महापालिका निवडणूक ऐतिहासिक वळणावर! १९ माजी नगरसेवक मैदानात; पक्षांना बंडखोरीचा फटका
यावेळी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव म्हणाले की, शहरातील पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन व भुयारी गटार योजनेबाबत अनेक शासकीय अडचणी आहेत. त्या एकाच वेळी दूर करण्यासाठी मंत्रालय स्तरावर संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी. एका बैठकीत निर्णय झाल्यास शहरातील रखडलेले प्रकल्प वेगाने पूर्ण करता येतील. तसेच पालिकेच्या तीन जागांवर सध्या राज्य शासनाचे नाव लागले असून, त्या जागा नगरपालिकेच्या नावे वर्ग करण्याचा महत्त्वाचा निर्णयही मंत्रालय स्तरावर होणे आवश्यक आहे.
कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही
पालकमंत्री शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी मुख्याधिकारी व प्रशासकीय यंत्रणेशी समन्वय ठेवून शहरातील महत्त्वाची कामे मार्गी लावावीत. शासनाने दिलेल्या निधीतून सुरू असलेल्या कामांचा दर्जा समाधानकारक आहे की नाही, याचा आढावा मी स्वतः घेणार आहे. विशेषतः पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांनी आपली जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेदेखील वाचा : नागपुरात तापमानात होतीये घट; 7.6 अंशापर्यंत घसरले तापमान, पुढील 12 तारखेपर्यंत…






