File Photo : Rain
गगनबावडा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : गगनबावडा तालुक्यात आठवडाभर सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी दिवसभर तर मंगळवारी दुपारनंतर अतिमुसळधार पावसाने झोडपले. घाटमाथ्यावर सर्वाधिक पाऊस झाला. कुंभी नदीच्या पुराने सलग चौथ्या दिवशी कळे-गगनबावडा या प्रमुख मार्गावरील वाहतूक बंद राहिली. बुधवारी सकाळी किंचितसा कमी झालेला पावसाचा जोर दुपारनंतर आणखी वाढला घाटमाथ्यावर जोराचा पाऊस झाला.
गगनबावडा, बोरबेट, वेसरफ, कोदे व बावेली इत्यादी ठिकाणी जोराचा पाऊस झाला. दिवसभर अतिशय जोरात वारे वाहत होते. बुधवारी दिवसभर किरवे ते लोंघे दरम्यानच्या रस्त्यावर पुराचे पाणी होते. त्यामुळे सलग चौथ्या दिवशी कळे-गगनबावडा मार्गावरील वाहतूक बंद राहिली. तालुक्यात अनेक ठिकाणी झालेल्या पडझडीत अतिशय नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील तिसंगी येथील रोडच्या साईटचे झाड उन्मळून पडले. त्याचबरोबर गुरुवारी मंदूर फाटा येथे जूने मोठे झाड उन्मळून रस्त्यावर पडले.
कुंभी, सरस्वती नद्या अजूनही पात्रा बाहेरच असून, कुंभी नदीवरील मांडूकली, शेनवडे व वेतवडे हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे धामणी नदीवरील सर्वच बंधारे पाण्याखाली गेले होते. गेल्या २४ तासात पावसाची धरण क्षेत्रात जोरदार बॅटींग झाली. कुंभी धरण सध्या क्षमतेच्या ७१ टक्के भरले आहे.