File Photo : Hiranyakeshi River
कोल्हापूर : संततधार पाऊस अन् अशातच आजरा तालुक्यातील सर्वच प्रकल्प तुडुंब झाल्याने हिरण्यकेशी नदीला पूर आला आहे. तालुक्यातील भडगाव पुलासह सहा बंधाऱ्यांत पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली. गडहिंग्लज शहरासह नदीकाठच्या गावांलगत नागरी वस्तीच्या दिशेने पुराच्या पाण्याची आगेकूच सुरू राहिल्याने येथील नागरिकांची धडधड वाढली आहे.
गुरुवारी येथील भडगाव पूल पाण्याखाली गेल्याने निम्म्याहून अधिक तालुक्याचा थेट संपर्क खंडित झाला आहे. या भागासह चंदगड तालुक्यात जाण्यासाठी आजरा तालुक्यातील गजरगाव बंधारामार्गे वाहतूक सुरु होती. मात्र, सकाळी गजरगाव बंधारा देखील पाण्याखाली गेला आहे. सतर्कता म्हणून या ठिकाणाहून वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पूरबाधित क्षेत्रांतील नागरिक धास्तावले
तालुक्यात ऐनापूर, जरळी, निलजी हे प्रमुख मार्गावरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यापूर्वीच पाण्याखाली गेले आहेत. पूर्व भागाचा तालुका मुख्यालयाशी होणारा संपर्क पूर्णतः खंडित झाला आहे. नदी काठालगतच्या गावांजवळ मोठ्या प्रमाणावर पाण्याची पातळी वाढल्याने संभाव्य पूरबाधित क्षेत्रांतील नागरिक धास्तावले आहेत.
हिरण्यकेशीवरील एकमेव खुला असलेला गजरगाव बंधाराही गुरुवारी सकाळी पाण्याखाली गेला. त्यामुळे तालुक्याच्या दक्षिण-पूर्व भागासह चंदगड तालुक्यात जाण्यासाठी सुरू असलेली पर्यायी वाहतूक खंडित झाली. पश्चिम घाटासह आजरा तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून हिरण्यकेशी व घटप्रभा या नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली.
आजरा तालुक्यातील सर्वच प्रकल्प तुडुंब
आजरा तालुक्यातील सर्वच प्रकल्प तुडुंब झाल्याने जराशा पावसातही हिरण्यकेशीमधील पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढला तर नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.