वारकऱ्यांच्या संख्येत यंदा झाली 25 ते 30 टक्के वाढ
यंदा माधीवर पावसाचे सावट नसल्याने मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी पंढरीनगरीत दाखल झाले होते. शहरात भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाला, मागील माधी वारीच्या तुलनेत यावर्षी 25 ते 30 टक्के वारकरी संख्या वाढलेली दिसत आहे. त्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. वारकरी संप्रदाय भागवत धर्माची पताका सदैव फडकवत ठेवत असून अशा वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शासन सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे.
वारीनिमित्त स्थानिक उद्योगातून झाली कोट्यवधी रुपयाची उलाढाल
माधी वारीनिमित्त स्थानिक उद्योगाच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल झाली. स्थानिक व्यवसायामधील हळदीकुंकू, बुक्का विक्री, पेढा विक्री, अगरबत्ती यासह पंढरीतील प्रसिद्ध चुरमुरे, घोंगडी यासारख्या छोट्या-मोठ्या उद्योगांमधून शेकडो कोटींची उलाढाल माधी वारीच्या निमित्ताने पाहायला मिळाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरीत दाखल होणारे भाविक मोठ्या भक्तीभावाने बुक्का, कुंकू यासह पंढरीच्या पेढ्याला मोठी पसंती देतात. या व्यवसायांमधील उलाढाल मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळाले.
एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी-मातेची नित्यपूजा
माधी एकादशीनिमित्त मंदिर समितीच्यावतीने श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची नित्यपूजा करण्यात आली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. शिवाजीराव मोरे, तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. यावेळी सदस्या शकुंतला नडगिरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, लेखाधिकारी मुकेश अनेचा व विभाग प्रमुख संजय कोकीळ उपस्थित होते.






