पुणेकरांचा मेट्रोला मिळतोय उदंड प्रतिसाद; सुमारे 1.60 लाख नागरिक करताहेत मेट्रोने प्रवास (संग्रहित फोटो)
पुणे : पुणे मेट्रोच्या सेवेला तीन वर्ष पूर्ण होत आहे. सुमारे एक लाख ६० हजार प्रवासी प्रति दिन मेट्रोने प्रवास करत आहेत. यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पुणेकरांना चांगला पर्याय उपलब्ध झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्यात ६ मार्च २०२२ रोजी पहिल्यांदा मेट्रो धावली होती. टप्प्याटप्प्याने सेवा वाढविली गेली. मेट्रो मार्गांच्या नेटवर्कचा विस्तार झाल्याने पुणेकरांसाठी एक वेगवान, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय उपलब्ध झाला आहे. पुणे मेट्रोचे ६ मार्च २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले होते. यानंतर दोन प्रारंभिक मार्गांसह, पीसीएमसी ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे कॉलेज या मार्गांवर मेट्रो सेवा सुरू झाली. त्यानंतर, मेट्रो नेटवर्कचा पुढे विस्तारित होत गेले.
पुणे मेट्रोच्या सुरुवातीच्या काळात २१,४७,७५७ प्रवासी होते (मार्च २०२२ ते जुलै २०२३ पर्यंत). १ ऑगस्ट २०२३ रोजी फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय, जिल्हा न्यायालय ते रूबी हॉल क्लिनिक आणि गरवारे कॉलेज ते जिल्हा न्यायालय या मार्गिकांच्या उद्घाटनानंतर प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आणि १,२३,२०,०६७ झाली.
प्रवासी संख्या पोहोचली १६९६९५५४ पर्यंत
रूबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या विस्तारामुळे प्रवासी संख्या १,६९,६९,५५४ पर्यंत पोहोचली. २९ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गिकांच्या उद्घाटनाने ६ मार्च २०२२ ते ५ मार्च २०२५ या कालावधीत एकूण प्रवासी संख्या ५,९८,७६,७४३ झाली. त्याचबरोबर एकूण महसूल ९३,००,०४,२६८ रुपये झाला. पुणे मेट्रोची दररोजची सरासरी प्रवासी संख्या सुमारे १,६०,००० आहे.