नीरावागज परिसरातील ७५ वर्षीय वृद्ध महिला गायब; (फोटो- सोशल मीडिया)
बारामती : तालुक्यातील नीरावागज परिसरात बिबट्याचा वावर आढळला असतानाच मंगळवारपासून (दि २५) या परिसरातील शेतात राहणारी ७५ वर्षीय वृद्ध महिला अचानक बेपत्ता झाल्याने या वृद्ध महिलेच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर भयभीत झाले आहे. दरम्यान, दैनिक ‘नवराष्ट्र’मध्ये या भागात बिबट्या आढळल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच वनविभागाने सतर्कतेची भूमिका घेऊन या परिसरामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे.
या परिसरात येळे वस्ती या ठिकाणी बिबट्या फिरत असल्याचे या भागातील नागरिकांनी पाहिले होते. याबाबत वन विभागाला माहिती दिल्यानंतर, ग्रामस्थांच्या मागणीनुसार बिबट्याच्या पावलाचे ठसे घेऊन सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. या सीसीटीव्हीमध्ये बिबट्याने एका कुत्र्याचा फडशा पाडल्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. त्यामुळे निरावागज परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर भयभीत झाले आहेत. केळे वस्ती या ठिकाणी संतोष कुंभार यांनी आपल्या घराभोवती बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये देखील घराजवळून बिबट्या जात असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणखीनच घाबरले होते.
दरम्यान, या ठिकाणी तातडीने पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली होती. सामाजिक कार्यकर्ते सुनील देवकाते यांनी पिंजरा न लावल्यास ग्रामस्थांना बरोबर घेऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबतचे वृत्त दैनिक ‘नवराष्ट्र’मध्ये प्रसिद्ध होताच, वन विभाग सतर्क झाला. तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मुरुम आळी या ठिकाणी संतोष कुंभार यांच्या घराच्या परिसरात पिंजरा बसवण्यात आला.
७५ वर्षीय वृद्ध महिला अचानक बेपत्ता
निरावागज परिसरातून मंगळवारपासून एक ७५ वर्षीय वृद्ध महिला अचानक बेपत्ता झाली आहे. शेतात फिरत असताना, अचानक ही महिला गायब झाल्याने या वृद्ध महिलेचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणावर भयभीत झाले आहे. सदर वृद्ध महिलेला शोधण्यासाठी कुटुंबीयांसह ग्रामस्थ परिसरात शोधत आहेत. मात्र, सदर महिला अद्याप सापडली नाही, बिबट्याचा वावर या परिसरात असल्याने संशय बळावला आहे.
जीवितहानी होण्याची भीती व्यक्त
वनविभागाने व प्रशासनाने याबाबत ठोस उपाययोजना करून रेस्क्यू टीमच्या माध्यमातून या वृद्ध महिलेचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्या आढळूनही वनविभागाने गांभीर्याने न घेतल्याने एखाद्याचा बळी जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या भागातील वृद्ध महिला अचानक गायब कशी काय झाली? हा भयभीत करणारा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेदेखील वाचा : Leopard Attack : मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावात बिबट्याची दहशत कायम; शेतकरी दिलीप राक्षे यांनी दाखवले धाडस






