पीएमपीʼला महामंडळाकडून ४ एकर जागा (फोटो- सोशल मीडिया)
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) आणि महाराष्ट्र स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन (एसटी महामंडळ) यांच्या दरम्यान आळंदी परिसरात नवीन बस आगार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत एसटीकडून चार एकर जमीन पीएमपीएमएलला देण्यास मंजूरी मिळाली आहे.
प्रस्तावनुसार, एसटीची मालकी असलेली आठ एकरांची जागा असून त्यापैकी चार एकर पीएमपीएमएलला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. या जागेवर सुमारे ८० बसगाड्या थांबू शकतील, असे आगार बांधकामाचे नियोजन आहे. या निर्णयामुळे आळंदी आणि आसपासच्या भागातील सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे. बस आगारामुळे बस रॅपिंग, देखभाल व पार्किंगची सोय सुलभ होईल आणि प्रवाशांना नियमित सेवा मिळण्यास मदत होईल.|
स्थानिक वाहनधारक तसेच प्रशासनाने या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता पुढील टप्प्यात विभागीय आयुक्त कार्यालयातून आवश्यक कागदपत्रांची परवानगी, जागेचे नकाशे मान्यता करणे व बांधकामाचा समावेश होईल. या प्रकल्पाचे वेळापत्रक आणि बांधकाम खर्च याबाबत अधिक माहिती पुढील महिन्यात जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पीएमपीचे ‘स्टेरिंग’ ठेकेदारांच्या हातात
पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा म्हणून पीएमपीला ओळखले जाते. रोज सुमारे ११ लाख प्रवाशाना आपल्या इच्छित स्थळी पोहचविणाऱ्या या पीएमपीचे स्टियरिंग आता ठेकेदारांच्या हाती जात आहे. सध्या पीएमपीचे स्व मालकीचे १ हजार २५ बस असून ठेकेदारांचे १ हजार १७३ बस आहेत. येत्या काही महिन्यात पीएमपीमध्ये १ हजार नवीन सीएनजी बस दाखल होणार आहेत. त्यावेळी ठेकेदारांची बस संख्या ही २ हजार १७३ होईल. पीएमपीत ठेकेदारांचे वाढते वर्चस्व हे नक्कीच सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने नुकसानदायक ठरणार आहे.
पीएमपीच्या ताफ्यात सध्या एकूण २,१९८ बस आहेत. यापैकी १,१७३ बस ठेकेदारांच्या मालकीच्या आहेत, तर १,०२५ बस पीएमपीच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत. सध्या ४९० इलेक्ट्रिक बस, १,२८१ सीएनजी बस आणि २२७ डिझेल बस पीएमपीमध्ये कार्यरत आहेत. यापैकी ७९८ सीएनजी आणि सर्व २२७ डिझेल बस पीएमपीच्या मालकीच्या आहेत, तर ४९० इलेक्ट्रिक व ४८३ सीएनजी बस ठेकेदारांच्या आहेत.आता लवकरच १,००० नवीन सीएनजी बस ताफ्यात दाखल होणार असून त्या सर्व ठेकेदारांच्या मालकीच्या असणार आहेत. त्यामुळे पीएमपीच्या बस व्यवस्थापनात खाजगीकरणाचा झपाट्याने शिरकाव होत असल्याचे स्पष्ट दिसून येते.






