केंद्रीय मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! 19,919 कोटींच्या चार महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी (फोटो-सोशल मीडिया)
Metro & Rail Development: केंद्रीय मंत्रिमंडळाने देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी एकाच दिवशी चार महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मोदी सरकारने १९,९१९ कोटी रुपयांच्या चार प्रमुख प्रकल्पांना मंजुरी दिली असून यामुळे भारत विकासाच्या प्रगती पथावर धावेल अशी आशा सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे. यांमध्ये पुणे मेट्रो विस्तारासाठी ९,८५८ कोटी रुपये तर,मुंबईजवळील बदलापूर-कर्जत मार्गावर दोन नवीन मार्गासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, रेअर अर्थ मॅग्नेट योजनेसाठी ७,२८० कोटी रुपये तर, गुजरातमधील ओखा-कनालस मार्गाचे दुहेरीकरण मंजूर करण्यात आले आहे. या प्रकल्पांचा लाखो प्रवाशांना थेट फायदा होऊन प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.
पुणे मेट्रोसाठी सर्वात मोठे बजेट
केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रोसाठी सर्वात मोठे बजेट मंजूर केले आहे. पुणे मेट्रो फेज १ च्या विस्तारासाठी तब्बल ९,८५८ कोटी मंजूर करण्यात आले असून यामध्ये ३२ किलोमीटर लांबीची नवीन लाईनचा सुद्धा समावेश आहे. हा नवीन मार्ग खराडी ते खडकवासला आणि नल स्टॉप ते माणिक बाग असा असून यामुळे पुण्याचे मेट्रो नेटवर्क सुमारे १०० किलोमीटरपेक्षा जास्त वाढेल. पुणेकरांसाठी हा वाहतूक कोंडी पासून वाचण्यासाठी सुखद निर्णय आहे.
भारत सरकारने भविष्यातील तंत्रज्ञान लक्षात घेऊन, दुर्मिळ पृथ्वी परमनंट चुंबक अर्थात REPM योजना सुद्धा मंजूर केली आहे. यासाठी ७,२८० कोटी रुपयांचे बजेट आहे. भारतात हाय-टेक मॅग्नेट तयार करण्याचे मुख्य उद्दिष्ट असून हे मॅग्नेट इलेक्ट्रिक वाहने आणि मोबाईल फोनमध्ये वापरले जातात. सध्या, आपण इतर देशांवर अवलंबून आहोत. परंतु, या निर्णयामुळे भारत स्वावलंबी होईल.
केंद्र सरकारने गुजरातमधील भाविकांना देखील आनंदाची बातमी दिली आहे. ओखा ते कानालूस रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला १,४५७ कोटी रुपये मंजूर करून देवभूमी द्वारकेला जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवली आहे. १५९ किलोमीटर लांबीच्या या मार्गामुळे मालगाड्या जलद गतीने धावतील.
मुंबई लोकल प्रवाशांसाठी ‘गुडन्यूज’
मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठीही महत्त्वाची बातमी आहे. बदलापूर आणि कर्जत दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून प्रकल्पासाठी १,३२४ कोटी रु. निधी उपलब्ध करून दिला आहे. या मार्गावर फक्त दोन मार्गिका असल्याने प्रचंड वाहतूक होते. मात्र, आता नवीन मार्गांमुळे लोकल गाड्या आणि मालगाड्या स्वतंत्रपणे धावू शकतील. यामुळे मुंबई लोकल प्रवाशांसाठी प्रवास सोपा होईल.
केंद्र सरकार या चार निर्णयांवर एकूण १९,९१९ कोटी रु. खर्च करत असून हा निर्णय रेल्वे आणि मेट्रो दोन्ही क्षेत्रांना विकसित करण्यासाठी महत्वाचा आहे. महाराष्ट्रासाठी पुणे प्रकल्प आणि मुंबई प्रकल्प गेम-चेंजर ठरणार असून दुर्मिळ पृथ्वी योजना देशाच्या तंत्रज्ञानाला एक नवीन दिशा देईल






