Rituraj Gaikwad sets record in T20 cricket : आयपीएल २०२६ साठी तयारी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जसाठी एक आनंदाची बातमी आता समोर आली आहे. सीएसके संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने हंगाम सुरू होण्यापूर्वीच आपल्या शानदार फलंदाजीचे कौशल्य दाखवून एक महत्त्वाची कामगिरी केली आहे. सध्या भारतीय संघाच्या बाहेर असलेला गायकवाड सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत आहे. जिथे त्याने टी-२० क्रिकेटमध्ये एक विक्रम नोंदवला आहे. जो कोणत्याही फलंदाजासाठी एक मैलाचा दगड ठरणारा आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने त्याच्या टी-२० कारकिर्दीत ५००० धावांचा टप्पा पार केला. या विक्रमात आयपीएलमधील सर्व सामने, आंतरराष्ट्रीय टी-२० आणि देशांतर्गत टी-२० सामने यांचा समावेश आहे. या कामगिरीसह, हा टप्पा गाठणारा ऋतुराज दुसरा सर्वात जलद भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या पुढे फक्त केएल राहुल हा भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज आहे.
केएल राहुलने १४३ डावांमध्ये ही किमया साधली आहे. तर गायकवाडने १४५ डावांमध्ये ५००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याच्या आतापर्यंतच्या टी-२० कारकिर्दीत सहा शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सरासरी सुमारे ३९.३३ असून स्ट्राईक रेट १४० पेक्षा देखील जास्त आहे, जो त्याच्या सातत्य आणि आक्रमकता स्पष्ट करतो.
ऋतुराज गायकवाड हा पराक्रम करणारा दुसरा सर्वात जलद भारतीय खेळाडू ठरला आहे, तरी हा विश्वविक्रम अजून देखील युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलच्या नावावर जमा आहे. गेलने केवळ १३२ डावांमध्ये ५००० धावा पूर्ण करून टी-२० क्रिकेटमध्ये एक असा बेंचमार्क स्थापित केला आहे ज्याच्यापर्यंत कोणत्याही फलंदाजाला पोहचणे कठीण आहे.
ऋतुराज गायकवाडचा फॉर्म देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये नेहमीच उत्कृष्ट असाच राहिला आहे, परंतु असे असेल तरी तो सध्या कोणत्याही क्रिकेट स्वरूपात भारतीय संघाचा भाग नाही. आयपीएलमध्ये त्याची कर्णधारपद आणि फलंदाजी दोन्हीची खूप प्रशंसा करण्यात आली होती. म्हणूनच चेन्नई सुपर किंग्जने त्याला २०२६ च्या आयपीएल हंगामासाठी आपली संघाकडे कायम ठेवले.
हेही वाचा : Ind vs Sa 2nd Test : ‘माझे भविष्य BCCI ठरवणार…’ गुवाहाटी कसोटी पराभवानंतर कोच गौतम गंभीरने स्पष्टच सांगितले…






