बारामती : पाणी देण्यासाठी मी जर कोणाला धमकावले असते तर जनतेने मला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाच नसता, जर कोणी धमकावलेच असेल तर पोलिसांत तक्रार दाखल करावी, पोलिस त्याबाबतची कार्यवाही करतील, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे जाहीरसभेतून नागरिकांना आवाहन
बारामतीमध्ये माध्यमांशी उपमुख्यमंत्री पवार यांनी संवाद साधला. सुपे येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांच्या दमबाजीला घाबरू नका, असे जाहीर सभेतून सांगितले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या टोला त्यांनी मारला होता. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी हे स्पष्टीकरण दिले. संस्था चालविताना संस्थेच्या पद्धतीनेच त्या चालवाव्या लागतात, राजकारण करताना राजकारणाच्या पद्धतीनेच ते करावे लागते, अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली.
अशा पद्धतीने काही नेत्यांची नाराजी पाहायला मिळते
बारामती लोकसभा मतदारसंघातील काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या प्रश्नाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, देशातील अनेक ठिकाणच्या निवडणुकांमध्ये अशा पद्धतीने काही नेत्यांची नाराजी असते. त्यानुसार त्यांना समजावून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. मी लोकप्रतिनिधी या नात्याने नाराजांना समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची नाराजी दूर झाली आहे, मात्र लोकशाहीमध्ये ज्याचा त्याचा प्रश्न असतो.
विजय शिवतारेंच्या भागात घेणार मेळावा
विजय शिवतारे यांच्या मागण्यांबाबत त्यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर काही भूमिका मांडली होती. त्याच वेळेस त्यांच्या भागात त्यांच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेण्याची इच्छा त्यांनी प्रदर्शित केली होती, त्यानुसार मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही ११ एप्रिल रोजी होणा-या त्यांच्या मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले. आम्ही बोलतो तसे वागतो, बदलत नाही, त्याप्रमाणे आम्ही शब्दाला जागून आम्ही तिघेही तेथे जाणार आहोत. एकनाथ खडसे यांच्या भाजपच्या घरवापसीबाबत ते म्हणाले, प्रत्येकाने काय करावे हे ज्याच्या त्याचा अधिकार आहे, राजकारणात अशा घटना घडत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून प्रत्येकाला अधिकार दिला आहे. त्यामुळे ते तो बजावतात.
संजय राऊत यांनी लोकसभेची लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे आहे, असे नमूद केले आहे. यावर अजित पवार यांनी पत्रकारांनाच तुम्हाला तरी खरंच अस वाटत का? असा प्रतिप्रश्न करीत ते म्हणाले एक वेळ नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही लढाई आहे, असे ते म्हणाले असते तर ते मान्य करता आले असते, पण त्यांचा पक्ष महाराष्ट्राबाहेर नाही, त्यामुळे असे होणार नाही. लोकांना पटेल असे तरी त्यांनी बोलावे, असा सल्लाही अजित पवार यांनी संजय राऊत यांना दिला.
Web Title: If i had threatened anyone public would not have given much support explanation by deputy cm ajit pawar nryb