इम्तियाज जलील (फोटो- सोशल मीडिया)
छत्रपती संभाजीनगर: केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. कालपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीची घोषणा होताच राज्यात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी बैठकांवर बैठका घेत आहेत. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने नांदेडच्या जागेवर लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. दरम्यान आता एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील निवडणुकीबाबत मोठे भाष्य केले आहे.
इम्तियाज जलील यांनी नांदेडच्या लोकसभेसाठी पोटनिवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर यासोबतच त्यांनी विधानसभा निवडणूक देखील लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील हे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या निवडणुकीला उभे राहिल्यामुळे कोणाला फटका बसणार हे पहावे लागणार आहे. नांदेडमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी आलेली आहे. मी राज्यातील एकमेव मुस्लिम खासदार होतो. त्याला पाडण्यासाठी कशी मेहनत घेतली ते लोकांनी पाहीले आहे. एमआयएम पक्ष राज्यात आल्यानंतर सर्वात अधिक प्रतिसाद हा नांदेडमध्ये मिळाला आहे, असे इम्तियाज जलील म्हणाले.
नांदेडमध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसचे वसंतराव चव्हाण निवडून आले. त्यांनी भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला. नांदेडमध्ये भाजपचा पराभव हा धक्कादायक समजला जात आहे. त्यामुळे आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.
नांदेड लोकसभेत कॉँग्रेसने दिला उमेदवार
केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. त्याचबरोबर राज्यातील एका जागेसाठी लोकसभा पोटनिवडणुक देखील जाहीर केली होती. नांदेड लोकसभा पोटनिवडणूक जाहीर असून यासाठी कॉंग्रेसकडून उमेदवार देखील जाहीर करण्यात आला आहे. पत्रक जारी करत काँग्रेसने उमेदवार जाहीर केला आहे.
नांदेडमध्ये कॉंग्रेस नेते वसंतराव चव्हाण यांचा विजय झाला होता. मात्र त्यांचे निधन झाल्यामुळे कॉंग्रेसकडून त्यांच्या मुलाला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने नुकतंच एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात काँग्रेसकडून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. आता नांदेड लोकसभा पोटनिवडणुक बिनविरोध होणार की महायुती देखील उमेदवार जाहीर करणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.