पुणे / दीपक मुनोत : राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी नणंद भावजय निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघात होत आहे.पवार कुटुंबातच होणारी ही निवडणूक असून वास्तविक लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार या गटांची मानली जात आहे. तथापि, कार्यकर्ते सैरभैर आणि सामान्य मतदारांमध्ये निरुत्साह असल्याने तसेच प्रखर उन्हाळ्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होण्याची भिती व्यक्त होत आहे.
बारामतीमधील उमेदवारांचे भवितव्य ७ मे रोजी मतदार ठरवतील आणि ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. २०१९,२०१४ आणि २००९ मध्ये मतदानाची टक्केवारी ६१.८२ टक्के,५८.८१ आणि ४६.०७ टक्के अनुक्रमे होती.
बारामती लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा विभागांचा समावेश आहे. दौंड, खडकवासला येथे भाजपचे इंदापूर, बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि पुरंदर, भोर मध्ये काॅंग्रेसचे आमदार आहेत. त्यापैकी इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, भाजपचे राहुल कुल या नेत्यांसह नाराजांची नाराजी दूर झाली आहे. ते आणि खडकवासला मतदारसंघाचे भिमराव तापकीर महायुतीच्या प्रचारासाठी काम करत आहेत, असे सांगितले जाते.
तर भोरचे संग्राम थोपटे,पुरंदरचे संजय जगताप आदी नेत्यांस काॅंग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार यांचे नेतृत्व मानणारे निष्ठावान कार्यकर्ते काम करत असल्याने तुतारी चिन्ह रुजत चालले आहे,असा दावा महाविकास आघाडीतर्फे केला जातो.
दरम्यान, काही ठिकाणी दमदाटी करुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा प्रचार करण्यासाठी भाग पाडले जात असल्याचा आरोप आहे. अजित पवार गटाने सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा राजकीय कारणांसाठी वापर करायला सुरुवात केल्याने नाराजी आहे. तसेच स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीला मदत केली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संबंधित कार्यकर्ते डोईजड होऊ शकतात या शंकेतून शिवसेना शिंदे गट, भाजपचे जुने कार्यकर्ते घड्याळाचा काटा फार जोराने फिरणार नाही,याची दक्षता घेत असल्याचे चित्र आहे.मतदान कमी होणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडणारे असल्याने सुप्त पध्दतीने त्याबद्दल दक्षता घेतली जात असल्याचे एका जाणकाराने नमूद केले.
दरम्यान, पवार कुटुंब पूर्वीपासून एकत्र होते. परंतु राजकारणातली महत्वाकांक्षा, त्यावरुन धुसफूस होतीच आता फक्त अजित पवार यांच्या भूमिकेमुळे ती जाहीरपणे समोर आली आहे. पूर्वी पवार कुटुंब एकमेकांवर बोलणे टाळायचे. पण आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना त्यांचे सैरभैर कार्यकर्ते टिकवण्यासाठी कुटुंबाबाबत बोलावे लागत असल्याचे सांगितले जाते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांनी मतदारसंघाच्या शहरी भागात, खडकवासला परिसरात उशिरा प्रचारासाठी सुरुवात केली. या दरम्यान सुप्रिया सुळे यांनी सोसायट्यांचे प्रश्न व नागरी समस्या समजावून घेण्यासाठी सातत्याने या परिसराशी संपर्क ठेवला होता. सुळे यांच्या प्रचाराची पत्रके तीन ते चार वेळा घरोघरी पोचल्यानंतर सुनेत्रा पवार यांचे पहिले पत्रक नुकतेच मतदारांना पाहायला मिळाले. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची साथ राष्ट्रवादी काँग्रेसला दिसत असली तरी खडकवासला भागात शिवसेना शिंदे गट प्रचारासाठी संपूर्ण ताकदीनिशी सक्रिय झालेला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ११.९४ टक्के मताधिक्य घेऊन विजय मिळवला. त्यांनी कांचन राहुल कूल यांचा पराभव केला. राष्ट्रवादी आणि भाजपला अनुक्रमे ५२.६३ टक्के आणि ४०.६९ टक्के मते मिळाली.
२०१४ मध्ये सुळे यांनीच निवडणूक जिंकली, तथापि त्यांचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटले. भाजपचा पाठिंबा असलेले, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना ४,५१,८४३ तर सुळे यांना ५,२१,५६२ मते मिळाली. २००९ मध्येही बारामती मतदारसंघातून सुळे यांची निवड झाली. त्यावेळी भाजपकडे तुल्यबळ उमेदवार नव्हता.
भारतीय जनता पक्ष किंवा तत्सम विरोधी मतांमध्ये होणारी वाढ आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट तसेच तुतारी फुंकणारा मनुष्य हे नवे पक्ष चिन्ह घेऊन लढण्याचे आव्हान यंदा सुप्रिया सुळे यांच्यापुढे आहे.
बाजी कोण मारणार?
राष्ट्रवादी काँग्रेसची प्रमुख नेतेमंडळी अजित पवार यांच्या सोबत असून सध्या सुप्रिया सुळे यांना ती कमतरता जाणवत आहे. तथापि, सामान्य कार्यकर्ता आपल्या सोबत असल्याचा दावा त्यांच्या पक्षातर्फे केला जातो. मोदी लाटेतही बारामतीचा गड शाबूत ठेवणाऱ्या पवार कुटुंबाने आता परस्परविरोधी भूमिका घेतल्याने बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांचे वर्चस्व राहणार की अजित पवार बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
नणंदेपुढे भावजयीचे प्रचारात आव्हान
सुनेत्रा पवार यांच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास राजकारणाची परंपरा असलेल्या घरातील सून म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करण्यात त्या कुठे कमी पडताना दिसत नाहीत. त्याचं वेळी स्वतःच्या नावाने आश्वासने देण्यापेक्षा ‘दादा ‘ शब्द देतात तो पाळतात , दादांची विकासाबाबत भूमिका तुम्हाला माहीतच आहे , असे दादांच्या कर्तुत्वाला पुढे ठेवत मतदारांना सामोरे जाणे त्या अधिक पसंत करत आहेत . त्यामुळे आपल्याबद्दल मतदारांच्या मनात काही प्रश्न निर्माण होणार नाहीत अशी अटकळ त्यांनी बांधलेली असावी असे वाटते. त्यामुळे सलग तीन वेळा कर्तुत्व सिद्ध करणाऱया नणदेपुढे भावजय प्रचारात आपले आव्हान कायम ठेवण्यात यशस्वी होईल असे दिसते.