International wrestling tournament in Baramati
बारामती/अमोल तोरणे : तब्बल अर्धा तासांहून अधिक वेळ चाललेल्या या चुरशीच्या लढतीमध्ये दोघांनीही एकमेकांना कडवी झुंज दिली. अखेर तोडीस तोड डाव प्रतिडाव दोघांनीही एकमेकांना टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघेही एकमेकांना सरस ठरले. त्यामुळे पंचांनी ही कुस्ती बरोबरीत सोडून या दोघांनाही तीन लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
द्वितीय क्रमांकात पृथ्वीराज आणि बाला रफिक विजयी
द्वितीय क्रमांकाची लढत महाराष्ट्र केसरी विजेता कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरुद्ध कुर्डूवाडीचा उपमहाराष्ट्र केसरी विजेता गणेश जगताप या दोघांमध्ये झाली, 30 मिनिटे चाललेल्या या चुरशीच्या लढतीत पृथ्वीराजने घटना डावावर गणेशला चितपट करून अडीच लाखाचे पारितोषिक पटकावले. तृतीय क्रमांकाच्या महाराष्ट्र केसरी विजेता बाला रफिक शेख विरुद्ध माऊली जमदाडे या लढतीत बालारफिकने दुहेरीपट पाडून माऊली जमदाडे याला चितपट करून दोन लाखाचे पारितोषिक पटकावले.
क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि ऑलिम्पिक ब्रांझ पदक विजेते योगेश्वर दत्त यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण
विजेत्या मल्लांना क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यासह राष्ट्रवादीचे युवा नेते जय पवार, ऑलिम्पिक ब्रांझ पदक विजेता योगेश्वर दत्त यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. चौथ्या क्रमांकाच्या बारामतीचा भारत मदने विरुद्ध योगेश पवार या लढतीमध्ये भारत मदने याने निकाल दावावर योगेश पवार याच्यावर मात करून दीड लाखाचे पारितोषिक पटकावले. महिलांच्या लढतीमध्ये पुण्याची सोनाली मंडलिक विरुद्ध बोरची सिद्धी खोपडे या लक्षवेधी लढतीत सोनालीने मानेवर कस चढवून सिद्धी हिचा पराभव करून ५० हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.
प्रसिद्ध कुस्तीपटू गीता फोगाट यांच्याकडून गौरवोद्गार
राष्ट्रवादीचे युवा नेते जय अजित पवार यांच्या पुढाकाराने बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती शहरातील शारदा प्रांगण या ठिकाणी या कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेत प्रमुख चार लढतींसह एकूण २०० लढती झाल्या. यामध्ये महिलांच्या देखील लढती झाल्या. सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके देण्यात आली.
दरम्यान, बारामती शहरातील शारदा प्रांगण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून मल्ल सहभागी झाले होते. अत्यंत नेटके व शिस्तबद्ध पद्धतीच्या नियोजनाचे कौतुक करताना प्रसिद्ध महिला मल्ल गीता फोगाट हिने अशा प्रकारची सर्वोत्कृष्ट नियोजनाची कुस्ती स्पर्धा महाराष्ट्रात प्रथमच आपण पाहत असल्याचे गौरवोद्गार काढून विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रासाठी विशेष प्रयत्न
क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रासाठी विशेष प्रयत्न केले जात असून, या क्षेत्रासाठी निधीदेखील मोठ्या प्रमाणावर वाढवला असल्याचे आपल्या भाषणात सांगून जय पवार व त्यांच्या टीमचे या कुस्ती स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन केले. योगेश्वर दत्त यांनीदेखील या कुस्ती स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जय पवार व त्यांचे सहकारी मल्लांना चांगले प्रोत्साहन देत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जय पवार यांनी आपल्या भाषणात विजेत्या मल्लांचे अभिनंदन केले. प्रास्ताविक उत्कर्ष काळे यांनी केले. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, विश्वासराव देवकाते, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, नरसिंह यादव, कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेता पवन कुमार, संभाजी होळकर, जय पाटील आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. समालोचक युवराज केची, प्रशांत भागवत, अनिल रुपनवर यांनी केले.