पुणे : चालू वर्षी उसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने पुणे (Pune) विभागातील साखर (Sugar) कारखान्याच्या काळात हंगाम जवळपास मध्यावर आला आहे. अशातच पुणे विभागातील सहकारी आणि खासगी असे एकूण ३० साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेगाने सुरू आहे. आत्तापर्यंत या विभागात सुमारे १ कोटी ६ लाख २२६ टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. त्यातून ९९ लाख २८ हजार ३२८ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. तर साखरेचा उतारा सरासरी ९. ३७ टक्के एवढा आला आहे.
यंदा पावसामुळे साखर कारखान्याच्या गळीत हंगामात सुरुवातीच्या काळात काही अडचणी आल्या होत्या. परंतु, त्यानंतर गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात ऊसाचे गाळप करण्याचे नियोजन साखर कारखान्यांनी केले आहे. मुळातच चालू वर्षी उसाचे क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे दिसून आले. पुणे विभागात सातारा, पुणे जिल्ह्यात ऊसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी वेळेवर झालेल्या पावसामुळे उसाच्या तीन लाख हेक्टरपर्यंत लागवडी झाल्या असल्याची स्थिती आहे. त्यापैकी यंदा गाळपसाठी सुमारे दोन लाख ७४ हजार १९६ हेक्टरवरील ऊस तोडणीसाठी उपलब्ध आहे. शासनाने १५ ऑक्टोबर २०२२ पासून साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्याचा आदेश दिले होते. सध्या सुरू असलेल्या साखर कारखान्यांमध्ये सहकारी १७ आणि खाजगी १३ साखर कारखान्यांनी उसाचे गाळप सुरू ठेवले आहे. या साखर कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता १ लाख ७३ हजार ५० टन एवढी आहे.
ऊस गळपात बारामती ॲग्रोची आघाडी
पुणे विभागात आत्तापर्यंत ३० साखर कारखान्यांनी ६७ लाख ३८ हजार टन उसाचे गाळप केले आहे. आत्तापर्यंत झालेल्या गाळपमध्ये बारामती ॲग्रो कारखान्याने सर्वाधिक आघाडी घेतली, तर कराडमधील रयत सहकारी साखर कारखान्याने साखर उताऱ्यात आघाडी घेतली आहे. आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर कारखान्याने देखील गाळपामध्ये लक्षणीय आघाडी घेतली असल्याचे दिसून येते.
दरम्यान, जिल्ह्यातील बारामती ॲग्रो साखर कारखान्याचा ११.४२ टक्के एवढा साखर उतारा आहे. विभागात सहकारी साखर कारखान्यांनी ५४ लाख ६२ हजार १३८ टन ऊसाचे गाळप केले. त्यातून ५३ लाख ५७ हजार ६६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर सरासरी साखर उतारा ९. ८१ टक्के एवढा होता. खाजगी साखर कारखान्यांनी आत्तापर्यंत ५१ लाख ३८ हजार ८८ गाळप केले त्यातून ५४ लाख ७० हजार ६६८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले साखर उतारा सरासरी ८. ९० टक्के एवढा राहिला आहे.
देशभरात ३५७ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित
सध्या राज्यात थंडीचे प्रमाण अधिक प्रमाणात आहे. थंडीचा फायदा उसाचा उतारा वाढण्यास होतो. ऊस उत्पादक प्रदेशांमध्ये सतत थंडीनाही कधी ढगाळ हवामान तर कधी कडक ऊन तर काही दिवस थंडी असे संमिश्र हवामान असल्याने साखर उताऱ्यात वाढ झाली नसल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. २०२२ – २३ यावर्षी देशभरात ३५७ लाख टन साखरेचे उत्पादन होणे अपेक्षित आहे. त्यामध्ये महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि कर्नाटक ही राज्य आघाडीवर राहतील असा अंदाज असल्याचे राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले.