Photo Credit :Social Media
पुणे: नुकत्यात हाती आलेल्या बातमीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाने इशारा दिल्यानंतर हा बंदोबस्त वाढण्यात आल्याची माहिती आहे. रविवारी (11 ऑगस्ट) सोलापूरातील कुर्डूवाडी येथे मराठा आंदोलकानी शरद पवारांची गाडी थांबवत त्यांना मराठा आरक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट कऱण्याचा आग्रह धरला. त्यावेळी आपला मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर आजही मराठा क्रांती ठोक मोर्चाने त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात; फेसबुकवरून उमेदवारीची घोषणा
दरम्यान, काल (11 ऑगस्ट) शरद पवार सोलापूर दौऱ्यावर होते. बार्शीत शेतकरी संवाद मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी ते निघाले असताना बार्शीतील टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर मराठा आंदोलकांनी शरद पवार यांची गाडी रोखली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका प्रमुख सागर लोकरे आणि मराठा आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवली होती.
गाडीच्या समोर आलेल्या आंदोलकांनी एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणीही केली. आंदोलकांनी गाडी अडवल्यानंतर शरद पवार गाडीतून बाहेर उतरले आणि आंदोलकांचे म्हणणेही ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी “मराठा आरक्षणाला आपला पाठींबा आहे,” असे स्पष्टपणे सांगितले. शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आंदोलकांनी पवारांची गाडी सोडली.
दरम्यान, राज्यभरात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. ठिकठिकाणी नेतेमंडळींना अडवून जाब विचारला जात आहे. विधानसभा निवडणुकीआधीच आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी मराठा समाजाकडून केली जात आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनीदेखील जनजागृती आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. तर राज्यभरात मराठा समाज बांधवही रस्त्यावर उतरताना दिसून येत आहेत.