संभाजीनगर तालुक्यातील दरकवाडी येथील स्थानिक रहिवाशी बाबासाहेब रामराव वाघ यांना अज्ञात फोनद्वारे भुमरे यांनी बाबासाहेबांच्या फोनवर कॉल करून 21 जून रोजी सकाळी दहा वाजता अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी बाबासाहेबांनी भुमरेंविरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली.
सदर फिर्यादीमध्ये तक्रारदाराने सांगितले की, माझ्या नावाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर मंजूर असून सदरील गावामध्ये पाणंद रस्त्याचे काम सुद्धा मंजुर झालेले आहेत. या रस्त्याचे काम सुरू झालेले नसताना त्याचे मास्टर काढले जात आहेत. त्यामुळे सदरील रस्त्याच्या कामात अनियमितता आढळून येत असून मंत्री संदिपान भुमरे यांच्या मुलाच्या नावाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या बाबी संबंधी त्यांचे स्वीय सहाय्यक सतीश मालपाणी यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी संपर्क केला. त्यांना यामध्ये विलास भुमरे हे सुद्धा सहभागी असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी माझा फोन कट केला.
त्यानंतर 21 जून रोजी सकाळी दहा वाजता संदिपान भुमरे यांनी अज्ञात फोनद्वारे माझ्या फोनवरती कॉल केला. त्यांनी माझे काहीही ऐकून न घेता सलग पाच -सहा मिनिटे शिव्या देण्यास सुरुवात केली. तसेच जीवे मारण्याची सुद्धा धमकी देण्यात आलेली असून पोलीस सुरक्षा देण्यात यावी,अशीही मागणी त्यांनी तक्रारीत केलेली आहेत.
तसेच, सदरील प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुध्दा फिर्यादी बाबासाहेब वाघ यांच्याशी संपर्क साधून त्यांना सुरक्षेची हमी दिली आहे. तसेच सर्व शिवसेना पक्ष व मी स्वतः तुमच्या पाठीशी असून असुन गद्दाराना घाबरण्याचे काहीही कारण नाही. त्यांच्या दडपशाहीविरोधात हिमतीने लढायचे असल्याचे म्हटले. तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सुद्धा संपर्क करून त्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे सांगितले आहेत.
फिर्यादी यांनी मंत्री संदिपान भुमरे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार सुद्धा दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांना सदर तक्रार घेण्यात येऊ नये असा आदेश दिला. त्यानंतर पोलिसांनी ही तक्रार आम्ही दाखल करून घेऊ शकत नाही यासाठी तुम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयात जा असे सांगण्यात आले.
दरम्यान, स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बाबासाहेब वाघ यांना अंबादास दानवे यांच्याकडे घेऊन आले. त्यानंतर सर्व प्रकरण सांगितल्यानंतर करमाड पोलीस स्टेशन येथे संपर्क करून त्यांना कायद्याप्रमाणे कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.