मसूर : वडोली निळेश्वर (ता.कराड) येथील अंतर्गत रस्त्यासाठी निधीची आवश्यकता होती. निधीअभावी अनेक वर्षे रस्ता झालेला नव्हता. या रस्त्यासाठी भाजप सातारा लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ यांच्या विशेष प्रयत्नाने ७ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याचा भूमिपूजन कार्यक्रम वेताळ यांच्या हस्ते झाला. यामुळे वडोली निळेश्वरच्या अंतर्गत रस्त्याची समस्या कायमची निकाली निघणार आहे.
वडोली निळेश्वरमधील प्रताप पवार यांच्या दुकानापासून बाळासो पवार यांच्या घरापर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला होता. या रस्ता दुरुस्तीची मागणी मागील अनेक वर्षांपासून होती. या रस्त्यासाठी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी २५-१५ योजनेंतर्गत ७ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. या निधी मंजुरीसाठी भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने हा अंतर्गत रस्ता लवकरच तयार होणार आहे.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, कराड उत्तर अध्यक्ष शंकर शेजवळ, उपाध्यक्ष शरद चव्हाण, सरचिटणीस तुकाराम नलावडे, जिल्हा सचिव दीपाली खोत, उपसरपंच जालिंदर पवार, चेअरमन सुरेश पाटील, शशिकांत डुबल, संचालक जयराम डुबल, ग्रामपंचायत सदस्य दीपक पवार, रघुनाथ भोसले, हणमंत पवार, बडा जगदाळे, बबन पवार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवा नेते रोहित डुबल यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध
कराड उत्तरमधील गावांमध्ये रस्ते, पाणी, वीज या समस्या आजही शिल्लक आहेत. या समस्या सोडवण्यासाठी गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून निधी मिळवण्यासाठी व विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे.
– रामकृष्ण वेताळ, सरचिटणीस, भाजप किसान मोर्चा, महाराष्ट्र.