Photo : Shashikant Shinde
मेढा : दत्तात्रय महाराज कळंबे यांनी उभारलेली जावली सहकारी बँक ही सर्वसामान्य कष्टकरी, माथाडी कामगार, सभासद यांची बँक आहे. या बँकेच्या निवडणुकीत बँकेला कुठलाही आर्थिक भुर्दंड लागू नये म्हणून आम्ही दोन पावले मागे आलो. याचा अर्थ असा नाही की फक्त कोणी एकट्यामुळे बॅंकेची निवडणूक बिनविरोध झाली. चार तालुक्यातील नेते मंडळी, कार्यकर्ते, पदाधिकारी व इच्छुक उमेदवार या सर्वांच्या सहकाऱ्यामुळेच बँकेची निवडणूक बिनविरोध झाली आहे, अशी माहिती आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी दिली.
या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये असणारे सर्वच किंगमेकर आहेत. माझ्यासह आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, माजी आमदार दगडूदादा सपकाळ, माजी आमदार सदाशिवभाऊ सपकाळ, वसंतराव मानकुबंरे, अमित कदम, राजेंद्र राजपुरे यांच्यासह जावली, महाबळेश्वर, वाई, सातारा या चार तालुक्यातील नेते, कार्यकर्ते इच्छुक उमेदवार या सर्वांच्या सहकार्यामुळेच निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाली आहे.
निवडणूक लागली असती तर बँकेला दीड कोटी खर्च झाला असता व बँक अडचणीत गेली असती. सध्या सहकारी संस्थांची परिस्थिती बिकट आहे. ज्या आहेत त्या संस्था टिकवणे फार जिकरीचे आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचारी यांचीही अपेक्षा होती की बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी. त्यामुळे सर्वांच्या प्रयत्नाला यश आले आणि निवडणूक बिनविरोध झाली, असेही ते म्हणाले.