पुणे: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत (Kolhapur By Election) महाविकास आघाडीच्या नेतृत्त्वात काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांचा विजय झाला. कोल्हापूरमध्ये निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर हिमालयात जाईन, असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. आता भाजपच्या कोल्हापूरमधील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली. “चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील तर मी देखील त्यांच्यासोबत जाईल,” असं म्हणत जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना खोचक टोला लगावला. ते आज पुण्यात (Pune) माध्यमांशी बोलत होते.
[read_also content=”हनुमान मंदिरात जाऊन महाविकास आघाडीच्या घोटाळ्यांची लंका जाळण्यासाठी प्रार्थना करणार, किरीट सोमय्यांची घोषणा https://www.navarashtra.com/maharashtra/kirit-somaiya-to-disclose-more-scams-of-mahavikas-aghadi-government-nrsr-269766.html”]
जयंत पाटील म्हणाले, “मी आज चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात आढावा घेण्यासाठी आलो आहे. त्यांनी कोल्हापूर मागेच सोडलं आहे, पण मी कोथरूडमधील कार्यकर्त्यांशी संवाद केला. त्यावरून चंद्रकांत पाटील यांना हाही मतदारसंघ सोडावा लागेल इतकं त्यांच्याविषयी प्रेम आपुलकी येथे दिसत आहे.”
“पराभव एका मताने केला काय आणि हजार मतांनी केला काय, पराभव हा पराभव असतो. चंद्रकांत पाटलांना निवडणुकीला उभं राहण्याची संधी होती, पण असो. चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील, तर मीही जाईन. माझी देखील हिमालयात जाण्याची इच्छा आहे. चंद्रकांत पाटलांचे आणि माझे चांगले संबंध आहेत,” असं म्हणत जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.
“कोल्हापूर पोटनिवडणुकीचा जसा तुम्हाला आनंद झाला आहे, तसा मला देखील झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकसंघ पद्धतीने काम केलं आहे. पुरोगामीत्वाकडे महाराष्ट्र झुकलेला आहे याचे हे द्योतक आहे. करवीरनगरीने दिलेला निकाल मार्गदर्शक आहे. राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम काही लोक करतात. त्यांना या निकालाने चपराक मिळाली आहे,” असंही जयंत पाटलांनी नमूद केलं.